भाजप, तुम्ही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेले नाही आहात : राज

Raj Thackeray speech live from Thane hawkers bullet train issues
Raj Thackeray speech live from Thane hawkers bullet train issues

ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज (शनिवार) ठाण्यात नुकत्याच संपलेल्या सभेत भाजपवर टीकास्त्र सोडले. 'तुम्ही सत्तेचा अमरपट्टा घेऊन जन्माला आले नाही आहात.'आमच्या पोरांवर दरोड्याच्या केसेस टाकाल, तर उद्या सत्ता जाताच तुमच्यावरही दरोड्याच्या केसेस पडतील,' या भाषेत राज यांनी भाजपला झोडपले. राज यांनी भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही सोडले नाही. बुलेट ट्रेन म्हणजे संयुक्त महाराष्ट्राची जखम भरून काढण्याचा मोदींचा प्रयत्न आहे, अशी जहाल टीका राज यांनी केली. 

राज ठाकरे यांचे भाषण LIVE

आमची आंदोलने

  • मनसेने आंदोलन केले नसते, तर महाराष्ट्रातील टोल बंद झाला नसता. आमच्या आंदोलनामुळे 64 टोल नाके अधिकृतरित्या बंद झाले. भाजप निवडणुकीपूर्वी सांगत होता, की आम्ही महाराष्ट्र टोलमुक्त करू. अजूनही का टोल सुरू आहेत महाराष्ट्रात? भाजपला हा प्रश्न का नाही विचारत? कारण, यांचे पैसे गुंतले आहेत. म्हणून हे टोल बंद करणार नाहीत...आणि मला प्रश्न विचारतात की मांडवली झाली का म्हणून. अनेक भाग आज फेरीवालेमुक्त झाले. मनसेमुळे. काँग्रेसला, भाजपला का नाही विचारत की मांडवली झाली का फेरीवाल्यांबरोबर म्हणून. हे पत्रकार प्रश्न आम्हालाच विचारतात. मराठी पाट्यांसाठी आंदोलन झाले. अनेक शहरांमधील पाट्या मराठी झाल्या. त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे. मोबाईल फोनवर फोन बिझी असताना आज जे मराठी एेकू येते, ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे. निवेदने देऊन ज्या कंपन्यांना हे समजत नसेल, त्यांच्या कानाखाली आवाज काढणार आम्ही. कायद्याने सांगितलेले समजत नसेल, तर खळ्ळं आवाज येणार. आज अशी किती आंदोलने झाली. माझे सरकार नाही. ज्यावेळी निट परीक्षेचा प्रश्न आला, तेव्हा पालक माझ्याकडे आले. विरोधासाठी विरोध मी कधी करणार नाही..

भाजप, अमरपट्टा नाहीय तुमच्याकडे

  • पुण्यामध्ये अजय शिंदे, आशिष देवधर, जवळपास तेरा जणांना जेलमध्ये ठेवले होते. फेरीवाल्यांच्या आंदोलनामुळे. लोकांना बरं वाटलं. सरकारला नाही. त्यांच्यावर दरोड्याच्या केसेस टाकल्या. माझ्या पोरांनी दरोडे टाकले? भाजप, तुम्ही सत्तेचा अमरपट्टा घेऊन जन्माला आलेले नाही आहात. ज्यावेळी सत्ता बदलेल, तेव्हा दरोड्याच्या केसेस तुमच्यावरही पडतील. पण हे येतात कुठे रस्त्यावर? यांना उमेदवार नाही सापडत. कार्यकर्ते कुठून सापडणार?

आमची शहरे वाचवणार

  • आमची शहरे बकाल होतातहेत. बाहेरून लोकं येताहेत. त्यांच्यावर खर्च होतोय आणि आमचा शेतकरी आत्महत्या करतोय. आमच्या ग्रामिण मुला-मुलींना शहरात कसे यायचे समजत नाहीय आणि हे ट्रेन भरून येताहेत. हे सरकारला समजत नाहीय. मला सरकारमधल्या व्यक्तीने परवा सांगितले, कोणालातरी सर्वोच्च न्यायालयात पाठवायचे आणि आधीच्या निर्णयाला स्टे आणायचा प्रयत्न चाललाय. हे सरकारचं काम आहे? कारण यांचे पैसे गुंतलेत. म्हणजे हे फेरीवाल्यांना परत रस्त्यावर बसवणार. हे राजकीय पक्ष शेण खाणार. त्यांना मत पडणार. आम्हाला नाही. आझाद मैदानावर रझाकार मुसलमानांनी आमच्या पोलीस भगिनींची अब्रू लुटली, तेव्हा त्याच्याविरोधात आम्ही मोर्चा काढला. दुसऱया राजकीय पक्षांची हिंमत झाली नाही. मी दरवेळी पोलिसांच्या बाजूने उभा राहतो. माझ्या महाराष्ट्रातील पोलीस अभिमानाने, ताठ मानेने उभा राहिला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. 

मराठी अस्तित्वावर घाला

  • या शहरांमधले मराठी माणसांचे अस्तित्व पुसून टाकायचे आहे. मांसाहाराला विरोध आताच का सुरू झाला? आम्ही कधी आग्रह केला का, की आज गटारी आहे, तुम्ही प्यायलाच पाहिजे. सरळ नाही प्यायलास, तर मांडीवर घेऊन पाजेन. ही काय नवीन टूम काढलीय. इमारती बांधायच्या. त्यात फक्त जैन, गुजराती, मुसलमानांनाच फ्लॅट देणार. याच्यासाठीच शिकलो का शाळेत की भारतीय माझे बांधव आहेत? जर सारे माझे बांधव असतील, तर याप्रमाणे नाही राहात. मिळूनमिसळून राहतात. दहा-पंधरा वर्षांपूर्वी ज्या गोष्टी होत्या, त्या आता जाणूनबुजून बिघडवल्या जात आहेत. बुलेट ट्रेनला माझा विरोध यामुळेच आहेत. आज नरेंद्र मोदी गुजरातचे पंतप्रधान म्हणून वागत आहेत. मोदींना गुजराती माणसाबद्दल प्रेम असेल, तर राज ठाकरेंना मराठी माणसाबद्दल प्रेम नसेल का? बुलेट ट्रेन सुरू करताना तुमच्या मनामध्ये अहमदाबाद आलंच कसं? संयुक्त महाराष्ट्रावेळी झालेली जखम बुलेट ट्रेनमधून भरून काढायचा हा डाव आहे. मुंबईला गरज नाही एक लाख दहा हजार कोटींच्या बुलेट ट्रेनची. तुम्ही फक्त अहमदाबादसाठी ही ट्रेन सुरू करताय. देशातल्या प्रत्येक नागरीकाने हे कर्ज फेडायचे आहे. यांच्या स्वप्नांसाठी. 

ट्रेन भरून येतात..रिकाम्या जातात

  • हे सगळे उद्योग सुरू आहेत. कशासाठी हा प्रकार सुरू आहे? मला कळत नाहीय. जी माणसं आज येताहेत आपल्या जिल्ह्यामध्ये. ठाण्यामध्ये अनेक वर्षे राहणारी माणसं आहेत, त्यांना विचारा की ठाणे काय होतं. सुंदर होतं ठाणं, पुणं, नागपूर, कोल्हापूर. या ज्या सगळ्या ट्रेन येताहेत, त्यातून माणसं फक्त येताहेत. जाताना ट्रेन रिकाम्या जाताहेत. परवा छटपुजा झाली. सगळं ट्रॅफिक जाम. कुणाच्या पुजेला माझा विरोध नाही. पण, ही पुजा नाही. ही तुम्ही आम्हाला ताकद दाखवताहात. या साध्या सरळ समजू नका गोष्टी. हे काय सहज होत नाहीयत. हे सगळे विळखे पडताहेत आपल्याला. आम्ही कशात गुंतलोय? तो ब्राम्हण...तो मराठा...तो माळी...तो वंजारी...तो आगरी...तुमच्यातल्या तुमच्यात भांडणं करा...तुमच्यात एकदा भांडणं लागली, की हे आहेतच तुमच्या छाताडावर नाचायला. आम्ही आमच्याच लोकांचा द्वेष करतोय. यालाही खतपाणी घालणारे मराठी नेतेच आहेत. फावतंय बाहेरच्यांचं. 

भुगोलाशिवाय इतिहास नाही

  • आमच्या शिवछत्रपतींच्यावेळी दोन वकील गुजराती होते. एकाचं नाव होतं वल्लभदास. दुसऱयाचं सुंदरजी प्रभुजी. आपल्या जवळची माणसं होती ती. आज ज्या प्रकारचं षडयंत्र रचलं जातंय, ते तुम्हाला बेघर करण्याचं. आज कदाचित हे तुम्हाला पटणार नाही. हातातली जमिन गेली, की नंतर पश्चातापाचा हात कपाळावर मारून घेणं सोडून हाती काही राहणार नाही. आजअखेर जगात जी युद्धं झाली, ती जमिनीसाठी. म्हणून मी एक शब्दप्रयोग वापरला होता, भुगोलाशिवाय इतिहास नाही. आणि तीच आमची जमीन सहज इतरांच्या हातात देत आहोत. 

मोदी, वारणसी स्वच्छ करा

  • आमची मराठी मुलं वडापाव विकतात. संध्याकाळी काम झालं, की गाडी घेऊन घरी जातात. आज दुकानदाराच्या समोर फुटपाथवर एक माणूस येऊन काही विकायला सुरूवात करतो. बरं कोर्टानं सांगितलेल्या नियमाप्रमाणं तुम्ही वागताय का? गरीब म्हणून आम्ही गप्प बसतो, तर आमच्या आया-बहिणींवर कॉमेंट करता. काय म्हणून आम्ही सहन करायचं? इतके प्रश्न या देशामध्ये आ वासून उभे आहेत, आणि आमचे पंतप्रधान सांगताहेत, कार्पेट टाकून योगा करा. हे पंतप्रधानांचं काम आहे का? तंगडी अडकली तर? आमच्या मित्राची पत्नी वाराणसीला गेली होती. गंगेत बोटीतून फिरत होते ते. फिरता फिरता त्या बोटीच्या बाजूनी तीन प्रेतं वरती आली. ही गोष्टी तीन महिन्यांपूर्वीची. कुठचा स्वच्छ भारत? हा मतदारसंघ कुणाचा? नरेंद्र मोदींचा. तुमचा वाराणसी मतदारसंघ स्वच्छ नाही करता आला आणि देश स्वच्छ करायला निघालात? कशासाठी ढोंग करता आहात? राजीव गांधींनंतर तीस वर्षांनंतर कुठच्या तरी एका माणसाच्या हातात बहुमत आलंय. जेव्हा आलं, तेव्हा आनंद झाला. खरंतर माझी इच्छा होती, की मोदींनी या लोकसंख्येला आळा घालण्याचा प्रयत्न करायला हवा होता. 

आहे का हिंमत फडणवीसांमध्ये?

  • उद्या आपल्याच देशामध्ये आपल्याला घुसखोरांविरुद्ध युद्ध करावं लागेल. महाराष्ट्रामधला मुसलमान जिथं राहतो, तिथं दंगली होत नाहीत. जिथं बाहेरच्या राज्यांमधले किंवा बांगलादेश-पाकिस्तानातले मोहल्ले उभे राहले आहेत, तिथंच दंगली होतात. आमच्याच पुढाऱयांच्या समोर हे मोहल्ले उभे राहात आहेत. महाराष्ट्राने घ्यायचे तरी किती अंगावरती. कर्नाटकचे मुख्यमंत्री सांगताहेत, कन्नड शिकावेच लागेल. आहे का हिंमत फडणवीसांमध्ये? ज्या त्या राज्यांमध्ये तिथल्या भाषेत व्यवहार होतात. आमच्याकडेच का इंग्रजी, हिंदी? बँकांमध्ये मराठीत व्यवहार झालेच पाहिजेत. आज कुठली निवडणूक नाही. माझ्या महाराष्ट्रात चांगलं घडलं पाहिजे, यासाठी माझा लढा आहे. 

महाराष्ट्र फोडू देणार नाही

  • समृद्धी महामार्गानं समृद्धी होणार असेल, तर मला मान्य आहे. तुम्ही महाराष्ट्राच्या पैशावर वेगळं राज्य निर्माण करणार असाल, तर फडणवीस समृद्धी महामार्ग मी मध्येच तोडून टाकेन. शिवछत्रपतींच्या आईंचा जन्म विदर्भातला. तुम्ही आई-मुलाची ताटातूट करताय? हे उद्योग सुरू आहेत? माझ्या विदर्भाचा विकास झाला, तर मला आवडेल. फडणवीस तुम्ही विदर्भाचा विकास करा. पण, वेगळं राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न कराल, तर तो मोडून काढू. वाईट वाटतं, की कुंपणच शेत खातं. अजून आम्हाला समजत नाहीय, की आमच्यावरचं संकट काय आहे. आमच्या भविष्यातल्या पिढ्यांना काय भोगावं लागणार आहे हे समजत नाहीय. हे सगळेजण तुमचा प्रदेश काबीज करायला येत आहेत. वसई-विरारमध्ये नव्या इमारतीत कोण राहायला आलेय पाहा. मराठी टक्का नाहीय. मुंबईत, ठाण्यात इथले लोकं बाहेर काढले जाताहेत. महाराष्ट्रातले 60-65-70 टक्के लोक शाहाकारी आहेत. पण, जे शाकाहारी इमारतींत त्यांना जागा देत नाहीत. कारण ते मराठी आहेत. हे आपापले मतदारसंघ बनवताहेत. 

...तर हाच हात वर जाईल

  • मी जसं पाहतोय, एेकतोय तसंच तुम्हीही बघायला सुरूवात केली पाहिजे. पंधरा-वीस वर्षांपूर्वीचा सलोख पुन्हा निर्माण होणार असेल, तर राज ठाकरेचा हात पुढे जाईल. पण, वेगळं काही करण्याचा प्रयत्न केलात, तर हाच हात वर जाईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com