राज ठाकरेंचं मनसे कार्यकर्त्यांना खास पत्र, कार्यकर्त्यांना केलं 'हे' आवाहन 

राज ठाकरेंचं मनसे कार्यकर्त्यांना खास पत्र, कार्यकर्त्यांना केलं 'हे' आवाहन 

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांसाठी एक पत्र लिहिलं आहे. मला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला येऊ नका. तुम्ही जिथे आहात तिथे जनतेला मदत करा, दिलासा द्या, याच माझ्यासाठी शुभेच्छा आहेत, असं आवाहन राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केलं आहे. 14 जून रोजी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी येऊ नये असं आवाहन कार्यकर्त्यांना त्यांनी पत्राद्वारे केलं. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज यांनी वाढदिवस साजरा करणं योग्य नसल्याचं म्हटलं आहे. कोरोनाच्या संकटाच्या काळात स्वत:चा जीव धोक्यात घालून आणि पदरमोड करून जनतेला मदत करणाऱ्या कार्यकर्त्यांचं राज ठाकरे यांनी कौतुक केलं आहे. मला असे सहकारी मिळाले याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी राज ठाकरे यांनी लिहिलेले पत्र ट्विटरवर शेअर केले आहे. तुमच्या भागातील नागरिकांना मदत करा त्याच माझ्यासाठी शुभेच्छा असतील असंही राज यांनी पत्रामध्ये म्हटलं आहे.

पत्रात राज ठाकरेंनी केलं हे आवाहन 

आज खूप दिवसांनी माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांशी मी पुन्हा थेट संवाद साधतोय याचा मला मनापासून आनंद होत आहे. मार्च महिन्यात करोनाचं संकट राज्यावर आणि देशावर येऊन कोसळलं आणि उत्तरोत्तर ते अधिक गडद होत गेलं. आजही त्याची तीव्रता कमी झाली आहे असं नाही. पण मागे मी एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत म्हटलं होतं त्याप्रमाणे जोपर्यंत या आजारावर योग्य औषध सापडत नाही तोपर्यंत आपल्याला कोरोना साथीसोबत जगण्याची तयारी मनाने करावी लागेल आणि सध्या एकूणच महाराष्ट्राने तशी तयारी केलेली दिसते.

गेल्या दोन, तीन महिन्यांच्या काळात येणाऱ्या बातम्या मन विषण्ण करणाऱ्या होत्या. त्यात दिलासा देणारी एक बातमी होती. ती म्हणजे माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं काम. ह्या कठीण प्रसंगात माझा महाराष्ट्र सैनिक जीवावर उदार होऊन, मोठ्या प्रमाणावर पदरमोड करून लोकांच्या मदतीला धावून जात होता. अन्नधान्य वाटपापासून ते रुग्णांना रुग्णालयात मिळवून देणाऱ्या, रुग्णांच्या कुटुंबीयांना धीर देऊन त्यांच्या गरजेला उभ्या राहणाऱ्या माझ्या महाराष्ट्र सैनिकांच्या बातम्या माझ्यापर्यंत पोहोचायच्या. त्याबद्दल ऐकून एकाच वेळी मला आनंद आणि अभिमान वाटायचा. 

माझ्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचं कौतुक मी अनेकांच्या तोंडून ऐकलं. अनेकांनी मला व्यक्तिश: कळवलं. असे सहकारी मिळाले हे माझं भाग्य आहे. माझ्या अनेक सैनिकांना करोना झाला. पण तरीही ते आणि त्यांचे कुटुंबीय मागे हटले नाहीत. महाराष्ट्राच्या निस्सीम व निर्व्याज प्रेमातूनच ही ताकद येते. तुमच्या या ताकदीला आणि तुमच्या कुटुंबीयांच्या धैर्याला आणि त्यागाला माझा सलाम.

कोरोनाच्या कठीण प्रसंगात महाराष्ट्र सैनिक जीवावर उदार होऊन, मोठ्या प्रमाणात पदरमोड करुन लोकांच्या मदतीला धावून जात आहे. अन्नधान्य वाटपापासून रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळवून देणे आणि त्यांच्या कुटुंबियांना धीर देणे, अशा बातम्या ऐकून मला आनंद आणि अभिमान वाटत राहायचा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com