मते मागताना लाज कशी वाटत नाही

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

गेल्या पाच वर्षांपूर्वी ज्या सत्ताधाऱ्यांनी जाहीरनाम्यात गोष्टी दिल्या त्या त्यांना पूर्ण करता आलेल्या नाहीत. पूर्ण केल्या नाहीत. तरी सुद्धा हे लोक मोठ्या हिमंतीने मते मागण्यासाठी येतात, अशा लोकांना मते मागताना लाज कशी वाटत नाही अशा शब्दात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला

नवी मुंबई : गेल्या पाच वर्षांपूर्वी ज्या सत्ताधाऱ्यांनी जाहीरनाम्यात गोष्टी दिल्या त्या त्यांना पूर्ण करता आलेल्या नाहीत. पूर्ण केल्या नाहीत. तरी सुद्धा हे लोक मोठ्या हिमंतीने मते मागण्यासाठी येतात, अशा लोकांना मते मागताना लाज कशी वाटत नाही अशा शब्दात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला.

राज्यभर टोलनाक्‍यांच्या आंदोलनानंतर मनसे 78 टोलनाके बंद करू शकते. परंतू शिवसेना-भाजपने त्यांच्या जाहीरनाम्यात लिहून सुद्धा आणि सरकार ताब्यात असूनही सत्ताधाऱ्यांनी राज्यातील टोलनाके बंद का करता आली नाहीत असा प्रश्‍न राज यांनी उपस्थि केला. बेलापूर मतदार संघातील मनसेचे उमेदवार गजानन काळेंच्या प्रचारासाठी नेरूळमध्ये आयोजित सभेत राज ठाकरे बोलत होते. राज्यातील अनेक तरूण-तरूणी नोकऱ्यांसाठी वणवण फिरत असतात तेव्हा कुठे असतात हे आमदार व खासदार, फक्त त्यांच्याच परिचयातील मूला-मूलींची कामे करायची का, हा प्रश्‍न तुम्हालाही का पडत नाही असा सवाल राज यांनी विचारला. सरकारचे राज्यावर लक्ष नाही, राज्यात रोजचे रोज जी बाहेरून माणसे येतात. त्यामुळे राज्यावर खर्चाचा ताण वाढतोय, जो पैसा भूमिपुत्रांवर खर्च व्हायला हवा तो बाहेरून येणाऱ्यांवर केला जात आहे. रेल्वे बोर्डाच्या नोकर भरतीबाबत जेव्हा स्थानिक मूले व मूलींसाठी मनसेने आंदोलन केले. तेव्हा देशात मला खलनायक ठरवला. मात्र गुजरातमध्ये आलेल्या बिहारमधील 20 हजार परप्रांतियांना जेव्हा अल्पेश ठाकूर नावाच्या व्यक्तीने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी एका रात्रीत हाकलून दिले तेव्हा त्याला भाजपने नायक ठरवला. असे सांगत भाजपची दुटप्पी भूमिका राज यांनी मांडली.

राज ठाकरे यांनी पंजाब-महाराष्ट्र बॅंकेवरील निर्बंधांवरून सरकारवरसडकून टीका केली. बॅंकेतील साडे दहा कोटी रूपयांरी रक्कम गायब आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारची तोंड बंद आहेत. यावर तुम्हाला राग येत नसल्यामुळे आजूबाजूला बजबजपूरी माजली असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. पण मला जो राग येतो तो मी आणि माझे मनसैनिक रस्त्यावर दाखवतो. सकाळी दहा वाजता नेरूळ येथे शाळेच्या पटांगणावर सभेचे आयोजन केले होते. सकाळ पाऊस सुरू असूनही ठाकरे यांचे भाषण ऐकण्यासाठी कोणीही सभेतून उठून गेले नाहीत. अखेर दुपारी 2 वाजता राज ठाकरे आल्यावर सभा सुरू झाली. 

शिवसेना-भाजपच्या जाहीरातबाजींवरून टीका 
पुन्हा आपले सरकार असे भाजपकडून बोलले जात आहे. स्वतःच ठरवताय आपले सरकार. शिवसेना जाहीरात करते हीच ती वेळ. आधी पाच वर्षे तुम्हाला वेळ नव्हता का. तेव्हा काय करत होतात. महाराष्ट्र काय भूखा चाललाय का, ताट-वाट्या घेऊन फिरतात. पूढे घेऊन जाण्यापेक्षा भिकेला कसे लागेल अशी आश्‍वासने देतात. युतीत आहात ना, एकत्र लढताय ना, मग एकदा ते ठरवा दहा की पाच रूपये, आत्तापासूनच ताटावरून भांडण असेल तर पूढे काय होईल अशा भाषेत राज ठाकरे यांनी त्यांच्या ठाकरी शैलीत टर उडवली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raj thakarey in belapur