राजभवनाखालील बंकरचे स्ट्रक्‍चरल ऑडिट सादर

किरण कारंडे
रविवार, 4 डिसेंबर 2016

सुरक्षितता, संवर्धनासाठी वास्तुविशारदाची नेमणूक; तत्काळ दुरुस्तीची शिफारस
मुंबई - राजभवनाच्या खाली काही दिवसांपूर्वी सापडलेल्या ब्रिटिशकालीन बंकरचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करून त्याबाबतचा अहवाल नुकताच राज्यपालांना देण्यात आला.

सुरक्षितता, संवर्धनासाठी वास्तुविशारदाची नेमणूक; तत्काळ दुरुस्तीची शिफारस
मुंबई - राजभवनाच्या खाली काही दिवसांपूर्वी सापडलेल्या ब्रिटिशकालीन बंकरचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करून त्याबाबतचा अहवाल नुकताच राज्यपालांना देण्यात आला.

बंकरमध्ये अनेक बदल आणि महत्त्वाची कामे करावी लागतील, असे अहवालात म्हटले असून, त्याविषयीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हा बंकर सर्वसामान्यांना पाहण्यासाठी खुला करायचा असेल तर तिथे पावसाळ्यापूर्वी काही महत्त्वाची कामेही करावी लागतील, त्यासाठी मोठा खर्च करावा लागेल, याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे. बंकरचा अभ्यास करून सुरक्षितता आणि संवर्धनासाठी विकास दिलावरी या वास्तुविशारदाची नेमणूक करण्यात आली आहे.

तत्कालीन राज्यपालांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून 1907 ते 1913 या कालावधीत या बंकरचे बांधकाम करून घेतले असावे, असा अंदाज आहे. बंकरचे दोन भाग असावेत आणि त्यातील दुसरा भाग काही वर्षांनंतर बांधण्यात आला असावा, असा अंदाज अहवालात वर्तवण्यात आला आहे. राजभवनच्या दरबार हॉलच्या तळाशी असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी सातत्याने गळती होत असल्यामुळे तत्काळ दुरुस्ती आवश्‍यक आहे. राज्यपालांच्या "व्हीव्हीआयपी' रूमला जोडणारा एक मार्ग बंद आहे. अनेक ठिकाणी बांधकामासाठी विशिष्ट पद्धत अवलंबावी लागेल. बंकरमध्ये हवा खेळती राहण्यासाठी केलेल्या उपाययोजनांच्या ठिकाणी आता हिरवळ आहे, तिथे हौदही बांधण्यात आला आहे. या गोष्टी पूर्ववत करताना राजभवनच्या सध्याच्या बांधकामाला धोका पोचण्याची शक्‍यता आहे, असे अहवालात नमूद केले आहे.

राजभवनातील प्रेक्षक गॅलरीतून सध्या नागरिकांना सूर्योदयाचे रमणीय दृश्‍य पाहता येते. बंकरही सर्वसामान्यांना पाहता आला पाहिजे, अशी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची इच्छा आहे. त्यासाठी बंकरमध्ये आवश्‍यक ती डागडुजी आणि प्रकाश व्यवस्था करावी, असे त्यांनी सांगितले आहे.

मुंबईतील "आयआयटी'च्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाच्या डॉ. सौविक बॅनर्जी यांनी हा अहवाल सादर केला आहे. त्यांनी केलेल्या सूचना -
- बंकरच्या भिंतींचे प्लॅस्टर पुन्हा करावे लागेल.
- अनेक ठिकाणी लोखंडाचे चॅनेल्स गंजले आहेत.
- कमकुवत आरसीसी स्लॅबची दुरुस्ती करण्याची गरज.
- अनेक ठिकाणी तत्काळ दुरुस्ती आवश्‍यक.
- विशिष्ट तंत्रज्ञानाने दुरुस्ती करावी लागेल.
- पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी ड्रेनेज लाइनची दुरुस्ती आवश्‍यक.

Web Title: Rajabhavan presented bunker structural audit