राजभवन हे सत्ताधाऱ्यांचा अड्डा - अशोक चव्हाण

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 19 मे 2018

मुंबई - भाजपने कर्नाटकमध्ये सत्ता काबीज करण्यासाठी लोकशाहीचा गळा घोटला. बहुमत नसतानाही भाजपने कर्नाटकात सत्ता स्थापन करून लोकशाहीचा खून केला असून, सध्या राजभवन म्हणजे सत्ताधाऱ्यांचा अड्डा बनल्याची टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. कर्नाटकच्या राज्यपालांच्या निषेधार्थ कॉंग्रेसतर्फे संपूर्ण देशात आज "लोकशाही वाचवा दिवस' म्हणून एक दिवसाचे सांकेतिक धरणे आंदोलन करण्यात आले.

कार्यकर्त्यांसमोर बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, भाजपने लोकशाहीची पाळेमुळे उपटून काढली आहेत. भाजपने भारताची लोकशाही धोक्‍यात आणून ठेवलेली आहे. राज्यपाल देश चालवत आहेत, असे चित्र निर्माण झालेले आहे. गोवा, मणिपूर, मेघालय आणि आता कर्नाटकात राज्यपालांनी भाजपच्या दबावाखाली निर्णय दिले आहेत.

राजभवन हे सत्ताधाऱ्यांचा अड्डा बनला आहे. सर्व सूत्रे राजभवनावरून हलत आहेत. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या जोडगोळीने दबावतंत्र वापरून राज्यपालांना निर्णय घ्यायला भाग पाडले आहे. कर्नाटकचे राज्यपाल संघाचे कार्यकर्ते आहेत. निवडणूक झाली की आमदार पळवायचे, पैसे वाटायचे, फोडाफोडीचे राजकारण करायचे, पोलिसांचा दबाव आणायचा, असले घाणेरडे राजकारण भाजप करत आहे. कॉंग्रेसने असे कधीही केलेले नाही, आम्ही नेहमी लोकांचा कौल ऐकला, लोकांच्या निर्णयाचे स्वागत केले. कॉंग्रेस नेहमी लोकांच्या बाजूने उभे राहिली. कॉंग्रेसने लोकशाहीचा नेहमी आदर केला आहे. कर्नाटकात उद्या कॉंग्रेस बहुमत सिद्ध करेल असा मला संपूर्ण विश्वास आहे, असे चव्हाण म्हणाले.

Web Title: rajbhavan ashok chavan politics