नागरी समस्यांच्या अर्धवट कामाच्या निषेधार्थ रमाईचे ठिय्या आंदोलन

दिनेश गोगी
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

कॅम्प नंबर 5 भागातील खडी मशीनच्या मागे असलेल्या लालचक्की परिसरात गोरगरीब नागरिक राहत असून ते मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत आहेत. असे असतानाही बहुतांश रहिवासी मालमत्ता कर भरतात.

उल्हासनगर - गेल्या दोन तीन वर्षापासुन पाण्याची लाईन टाकण्याचे व सौचालय बनवण्याचे काम अर्धवट स्थितीत पडलेले आहे. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. ही कामे पूर्ण करण्यासाठी वारंवार पाठपुरावा करण्यात आल्यावरही त्याकडे अधिकारी कानाडोळा करत असल्याच्या निषेधार्थ रमाई महिला मंडळाने आज उल्हासनगर पालिका प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले.

कॅम्प नंबर 5 भागातील खडी मशीनच्या मागे असलेल्या लालचक्की परिसरात गोरगरीब नागरिक राहत असून ते मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत आहेत. असे असतानाही बहुतांश रहिवासी मालमत्ता कर भरतात. गेल्या अनेक वर्षापासून भेडसावत असलेल्या पाण्याच्या समस्यांच्या तक्रारी गृहीत धरून पालिकेने या भागात पाण्याची लाईन टाकण्याचे व सौचालय बांधण्याचे काम सुरू केलेले आहे. मात्र दोनतीन वर्षापासून हे काम अर्धवट स्थितीत सोडण्यात आल्याने पाण्यापासून घसा कोरडा व सौचालय विना कुचंबना अशी अवस्था नागरिकांची झाली आहे.

शेवटी संयमाचा बांध फुटल्याने आज शिवसेना अपंग सहाय्य सेनेचे कल्याण लोकसभा अध्यक्ष भरत खरे, रमाई महिला मंडळाच्या अध्यक्षा कविता कांबळे, सचिव सारिका ढाले, कोषाध्यक्ष शारदा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पालिकेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी आयुक्त गणेश पाटील यांची भेट घेतली असता, त्यांनी अधिकाऱ्यांना बोलवून येत्या वीस दिवसात अर्धवट सोडलेली पाण्याची लाईन व सौचालयाचे काम मार्गी लावण्याचे आदेश दिले.
 

Web Title: Ramai thiyya agitation due to civil problems