रामदास आठवले नक्की कुणाचे? 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

उल्हासनगर - एकीकडे केंद्रात रिपब्लिकन भाजपसोबत आहे; तर दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने वेगळी चूल मांडली आहे. नुकताच शिवसेनेचा उल्हासनगर पालिका निवडणुकीचा वचननामा प्रसिद्ध झाला. यात रिपब्लिकनचे नेते रामदास आठवले यांचेही छायाचित्र असल्याने केंद्रात भाजपच्या आशीर्वादाने मंत्रिपद भोगत असलेले आठवले नेमके भाजपचे की शिवसेनेचे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

उल्हासनगर पालिका निवडणुकीत रिपब्लिकनने शिवसेनेसोबत घरोबा केला आहे; तर मुंबई पालिकेत भाजपशी दिलजमाई केली आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षाच्या बॅनरवर रामदास आठवले झळकत आहेत. ठाण्यामध्ये रिपब्लिकनच्या एका गटाने शिवसेनेला पाठिंबा दर्शवला आहे. उल्हासनगरमध्ये शिवसेना आणि रिपब्लिकनचे कार्यकर्ते  शिवशक्ती आणी भीमशक्तीचा नारा देत आहेत; तर मुंबईत भाजप आणि रिपब्लिकन कार्यकर्ते एकत्रितपणे परिवर्तनाचे स्वप्न दाखवून मतांचा जोगवा मागत आहेत. त्यामुळे मुंबई आणि  उल्हासनगर पालिकेतील विसंगत भूमिकेमुळे रिपब्लिकन पक्षात नेमकी काय राजकीय गणिते सुरू आहेत, अशी कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू आहे.

टीका कुणावर करायची?
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत एकाच वेळी भाजप आणि शिवसेनेशी वेगवेगळ्या ठिकाणी घरोबा केल्यामुळे रिपब्लिकन कार्यकर्ते संभ्रमात पडले असून सोशल मीडियावर टीका नेमकी भाजपवर करायची की शिवसेनेवर, याबाबत कार्यकर्त्यांची कोंडी झाली आहे.  उल्हासनगरमध्येही रिपब्लिकनचे अगोदर भाजपशी सूत जुळले. त्यानंतर अचानक शिवसेनेशी जवळीक साधणार असल्याचे जाहीर केले. बदलत्या भूमिकेमुळे रिपब्लिकनच्या स्थानिक आणि वरिष्ठ पातळीवरील नेत्यांमध्ये ‘सुसंवादाची’ कमी आहे काय, असा सवाल निर्माण होतो आहे.

Web Title: ramdas athawale