ठाणे : बकरी ईदनिमित्त चक्क बकऱ्यांचा 'रॅम्प शो'

दीपक शेलार   
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे राज्यात बळीराजा आत्महत्येचा मार्ग स्विकारत आहे. असे असताना ठाण्यातील उद्यमशील शेतकऱ्याने सरकारच्या कुठल्याही मदतीशिवाय पशुपालन व्यवसायाला ग्लोबल स्वरूप देऊन प्रेरणादायी उपक्रम राबवला आहे.

ठाणे : दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे राज्यात बळीराजा आत्महत्येचा मार्ग स्विकारत आहे. असे असताना ठाण्यातील उद्यमशील शेतकऱ्याने सरकारच्या कुठल्याही मदतीशिवाय पशुपालन व्यवसायाला ग्लोबल स्वरूप देऊन प्रेरणादायी उपक्रम राबवला आहे. फैज अहमद शेख असे त्या अवलिया शेतकऱ्याचे नाव असून, त्याने नैसर्गिकरित्या बकरी पालनाचा व्यवसाय सफल करून दाखवला. बकरी ईदनिमित्त त्याने विक्रीसाठी आणलेल्या बकऱ्यांचे आकर्षक नामकरण करून ठाण्यात चक्क रॅम्प शो आयोजित केला.

ठाण्यात बांधकाम व्यावसायिक असलेले फैज शेख यांनी आपल्या मूळ गावी औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील सायगव्हाण गावी एफ.ए.गोट फार्म उभारून पशुपालन व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली आहे.त्याच्या फार्म हाऊसमध्ये पहिल्या वर्षी तब्बल शंभरहून अधिक बकऱ्यांची पैदास केली आहे.बकरी ईद या सणाचे औचित्य साधून त्यांनी ठाण्यात आगळ्या वेगळ्या पद्धतीने बकऱ्यांची विक्री सुरू केली आहे.

पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने त्यांनी बकऱ्यांचा "रॅम्प शो" ठाण्यात भरवला होता. यात सुलतान, शाहरुख, टायगर, किंग, गब्बर, पांडा आदी नामकरण केलेले विविध जातींचे 32 प्रकारचे बोकड या 'रॅम्प शो'मध्ये सहभागी केले होते. महाराष्टातील शेतकरी व पशुपालन करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी फैज शेख यांनी वेगळ्या पद्धतीने बकऱ्यांची विक्री करण्याचे ठरवले आहे. 

मुंबई-ठाण्यात बकऱ्यांची विक्री जोरात होते. यात परराज्यातून बकरे येत असल्याने महाराष्ट्राचा सर्व महसूल इतर राज्यांकडे जातो. तेव्हा स्वतःच्या हिमतीवर शेतीसोबत शेळीपालन हा जोडधंदा शेख यांनी सुरु केला आहे. मात्र, दलालांच्या विळख्यात अडकलेल्या या व्यवसायाला अधिक चालना मिळावी, यासाठी शेख यांनी स्वतःच बकऱ्यांचे संगोपन करून मुंबई, ठाण्यासख्या शहरी भागात बकरी ईद निमित्ताने व्यवसाय करण्याचे ठरवले.

शासनाकडून कोणत्याही प्रकारच्या योजनांचा लाभ न घेता हे बकरे संगोपन करून बाजारात विक्रीसाठी उपलब्ध केले आहेत. यंदाचा हा त्यांचा पहिलाच प्रयोग असून, संगोपन करून वाढवलेल्या प्रत्येक बोकडाला त्यांनी आकर्षक नावेदेखील दिली आहेत.

संगोपन करण्यासाठी प्रत्येक बकऱ्यांच्या मागे 650 ते 700 रुपये खर्च येत असल्याचे फैज शेख यांनी सांगितले. कुठल्याही प्रकारची वजन वाढविण्याचे अनैसर्गिक औषधे न देता शेतीमध्ये उत्पादित केलेले गवत,धान्य,डाळी ई.आहार देऊन पालनपोषण केलेले बोकड ठाण्यात आयोजित केलेल्या रॅम्प शोच्या माध्यमातून विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. बकऱ्यांच्या या आगळ्यावेगळ्या "शो" मुळे हौश्या-नवश्या-गवश्यांसह बोकड खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ramp show of goats for Bakari Eid in Thane