राणीबागेतील एका पेंग्विनचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 ऑक्टोबर 2016

मुंबई - भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालयातील आठ पेंग्विनपैकी एका मादी पेंग्विनचा आज सकाळी 8.15 वाजता यकृताच्या आजाराने मृत्यू झाला. उर्वरित सात पेंग्विन निरोगी असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. 

मुंबई - भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालयातील आठ पेंग्विनपैकी एका मादी पेंग्विनचा आज सकाळी 8.15 वाजता यकृताच्या आजाराने मृत्यू झाला. उर्वरित सात पेंग्विन निरोगी असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. 

दक्षिण कोरियातून जुलैमध्ये हम्बोल्ट जातीचे तीन नर आणि पाच मादी पेंग्विन वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालयात (राणी बाग) आणले होते. त्यापैकी एक मादी 18 ऑक्‍टोबरपासून आजारी होती. तिची भूक कमी झाल्याचे आणि तिला श्‍वसनाचा त्रास होत असल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी परदेशी पक्षितज्ज्ञांच्या सल्ल्याने तिच्यावर चार दिवसांपासून उपचार सुरू केले; मात्र ती उपचारांना प्रतिसाद देत नव्हती. तिच्या रक्ताची चाचणी केल्यानंतर तिच्या यकृतात संसर्ग झाल्याचे आढळून आले; परंतु उपचारांनंतरही तिच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. त्यानंतर आणखी एका परदेशी पक्षितज्ज्ञाचे मत घेण्यात आले. त्याच्या सल्ल्यानुसार तिची क्ष-किरण तपासणी आणि सोनोग्राफी करण्यात आली. उपचार लागू पडत नसल्याने ती आज दगावली. 

पशुवैद्यकीय तज्ज्ञांनी तिला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले; परंतु त्यांना यश आले नाही, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या सूत्रांनी दिली. तिचे शवविच्छेदन आज दुपारी परळ येथील पॅथॉलॉजी विभागातील प्राध्यापकांच्या सहाय्याने करण्यात आले. शवविच्छेदनातूनही तिच्या मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नाही. 

मृत्यूचेही राजकारण 
शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या हट्टामुळेच हा मृत्यू झाला आहे, त्यामुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी विरोधक करू लागले आहेत. "आदित्य यांच्या बालहट्टामुळे पेंग्विनला राणी बागेत आणले होते. त्यांचे हे ड्रीम प्रोजेक्‍ट होते. इथले वातावरण पेंग्विनला पोषक नाही. त्यांच्या हट्टामुळेच पेंग्विनचा मृत्यू झाल्याने संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी स्वाभिमान संघटनेचे नेते नीतेश राणे यांनी केली आहे; तर मनसेचे पालिकेतील गटनेते संदीप देशपांडे यांनी, "ड्रीम प्रोजेक्‍ट नागरिकांच्या पैशांतून कशाला? त्यासाठी स्वतःचे पैसे लावा', अशी टीका केली आहे. या प्रकल्पासाठी 24 कोटी रुपये खर्च येणार आहे. हा पैसा नागरिकांचा आहे. हट्टापायी पक्ष्यांचा जीव जात आहे. याला जबाबदार कोण, असा सवालही त्यांनी केला आहे.

Web Title: rani baug penguin dies