पेंग्विनदर्शनाअभावी शिवसेना, कॉंग्रेस नाराज

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 मार्च 2017

मुंबई - राणीच्या बागेतील पेंग्विनचे मुखदर्शन होत नसल्याने शिवसेना आणि कॉंग्रेसही नाराज आहे. राजकीय दबावामुळे महापालिका प्रशासन पेंग्विनच्या शीतकक्षाचे उद्‌घाटन करत नसल्याचा आरोप शिवसेनेने केला असून शिवसेनेचाच महापौर हे उद्‌घाटन करेल, असा दावाही करण्यात आला आहे.

मुंबई - राणीच्या बागेतील पेंग्विनचे मुखदर्शन होत नसल्याने शिवसेना आणि कॉंग्रेसही नाराज आहे. राजकीय दबावामुळे महापालिका प्रशासन पेंग्विनच्या शीतकक्षाचे उद्‌घाटन करत नसल्याचा आरोप शिवसेनेने केला असून शिवसेनेचाच महापौर हे उद्‌घाटन करेल, असा दावाही करण्यात आला आहे.

राणीच्या बागेत पेंग्विनसाठी शीतकक्ष तयार करण्यात आले आहेत; मात्र तेथील वातावरण पेंग्विनसाठी पोषक नसल्याने त्यांना या कक्षात हलवण्यात आलेले नाही, असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे; मात्र शिवसेनेने प्रशासनाच्या या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे.

भाजपकडून राजकीय दबाव येत असल्याने प्रशासन पेंग्विनना नव्या कक्षात हलवत नसल्याचा अप्रत्यक्ष आरोप शिवसेनेकडून करण्यात येत आहे. नवे कक्ष योग्य आहे; मात्र राजकीय दबावामुळे प्रशासन पेंग्विनना तेथे हलवत नाही, असा आरोप सभागृहनेत्या तृष्णा विश्‍वासराव यांनी केला. मात्र काही झाले तरी त्याचे उद्‌घाटन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महापौरांच्या हस्ते होईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. महापौर निवडणुकीनंतर पेंग्विनच्या कक्षाचे उद्‌घाटन करण्याचा प्रशासनाचा डाव असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.

कॉंग्रेसनेही प्रशासनाच्या या निर्णयावर संशय व्यक्त केला आहे. डिसेंबरपर्यंत हे कक्ष सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले होते; मात्र राजकीय दबावामुळे पेंग्विनना हलवण्यात आले नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी केला आहे.

शिवसेनेचा बहिष्कार
स्थायी समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत गुरुवारपर्यंत पेंग्विन या शीतकक्षात आणले जातील, असे आश्‍वासन प्रशासनाने दिले होते. त्यानुसार आज स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे यांच्यासह विरोधी पक्षनेते छेडा, साभगृहनेत्या तृष्णा विश्‍वासराव, शिक्षण समिती अध्यक्षा हेमांगी वरळीकर, शिवसेनेचे सदस्य रमाकांत रहाटे पेंग्विन पाहण्यासाठी गेले; मात्र पेंग्विन तेथे नसल्याने त्यांचा हिरमोड झाला. त्यामुळे नाराज झालेल्या अध्यक्षांसह शिवसेनेचे सदस्य तात्पुरत्या कक्षात पेंग्विन पाहण्यासाठी गेले नाहीत.

पेंग्विनना सवय होईपर्यंत .....
पेंग्विनना त्यांच्या शीतकक्षात हलवल्यानंतर तत्काळ त्याचे उद्‌घाटन करण्यात येणार नाही. पेंग्विन अतिसंवेदनशील असून येथेही नवे आहेत. त्यामुळे त्यांना पाहण्यासाठी मोठी झुंबड उडण्याची शक्‍यता आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी पाहण्याची सवय नसल्यास त्याचा दुष्परिणाम त्यांच्यावर होऊ शकतो. त्यामुळे सुरवातीचे काही दिवस बागेतील कर्मचारी वारंवार या कक्षाला भेट देतील. त्यानंतर काही दिवसांनी उद्‌घाटन करण्यात येईल, असे समजते.

Web Title: ranichi bag pengvin