राणीच्या बागेत सिंहाच्या आगमनाची प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मे 2019

राणीबाग कर्मचारी सुखावले
वृद्धापकाळाने दोन वर्षांपूर्वी राणीबागेतील हिमालयीन मादी जमुना अस्वलाचा मृत्यू झाला होता. जमुनेच्या जोडीदाराचे निधन झाल्यानंतर एकलकोंड्या अवस्थेतच ती अखेरचे क्षण जगत होती. मात्र, आता मादी अस्वल आल्याने राणीबाग कर्मचारी सुखावले आहेत. एका वर्षाच्या मादी अस्वलाचे नावही ठेवण्यात आले आहे.

मुंबई - भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालय अर्थात राणीच्या बागेत बिबटे, बारशिंगा, दोन कोल्ह्याच्या जोड्या आणि अस्वल आणल्यानंतर आता प्राणिप्रेमींना जंगलाचा राजा असलेल्या सिंहाच्या आगमनाची प्रतीक्षा आहे. सोमवारी सुरतमधील प्राणिसंग्रहालयातून कोल्ह्याची जोडी आणि एक मादी अस्वलाचे राणीबागेत आगमन झाले. आता गुजरातहूनच सिंहाचे आगमन होणार आहे. 

पहिल्या टप्प्यात मे महिन्याच्या अखेरीस सिंहाची एक जोडी आणली जाईल. पावसाळ्यानंतर दुसऱ्या जोडीला आणण्याचा राणीबाग प्रशासनाचा  विचार आहे. मात्र, राणीबागेतील सिंहाच्या आगमनावर अंतिम निर्णय दिल्लीतील केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडून घेतला जाईल. 

सुरतहून अडीच आणि तीन वर्षांचे दोन कोल्हे आणण्यात आले आहेत. एका वर्षाच्या अस्वलाचे पिल्लूही आले आहे. तिघांचे आगमन झाले असले, तरीही अाधी आणलेले प्राणी आणि नव्याने येणाऱ्या सिंहांना प्रदर्शनी भागात ठेवण्याचा निर्णय आताच घेता येणार नाही, असे राणीबाग प्रशासनाने सांगितले.

प्राण्यांबाबत सर्व काही सुरळीत झाल्यानंतरच त्यांना प्रदर्शनीय भागात ठेवले जाईल. तोपर्यंत प्राण्यांच्या पिंजऱ्यांचे कामही पूर्ण होईल, अशी माहिती राणीबाग प्रशासनाकडून देण्यात आली.

Web Title: Ranichi Bagh Lion