‘पोर्न साईट’वरून खंडणीच्या धमक्या

अनिश पाटील
सोमवार, 8 ऑक्टोबर 2018

मुंबई - तुम्ही पोर्न संकेतस्थळांवर जाऊन व्हिडीओ पाहत असाल तर सावधान! कारण रॅन्समवेअरनंतर आता पोर्न खंडणीचा नवीन प्रकार समोर आला आहे. त्यात गोपनीय माहिती मिळवल्याचा ई-मेल पाठवून बिटकॉइनमध्ये खंडणीच्या रकमेची मागणी केली जात आहे. मुंबईतील विविध पोलिस ठाण्यांत अशा पाचहून अधिक तक्रारी आल्या आहेत.

मुंबई - तुम्ही पोर्न संकेतस्थळांवर जाऊन व्हिडीओ पाहत असाल तर सावधान! कारण रॅन्समवेअरनंतर आता पोर्न खंडणीचा नवीन प्रकार समोर आला आहे. त्यात गोपनीय माहिती मिळवल्याचा ई-मेल पाठवून बिटकॉइनमध्ये खंडणीच्या रकमेची मागणी केली जात आहे. मुंबईतील विविध पोलिस ठाण्यांत अशा पाचहून अधिक तक्रारी आल्या आहेत.

पश्‍चिम उपनगरात राहणाऱ्या एका तक्रारदाराने नुकतीच सायबर पोलिसांकडे याबाबत तक्रार केली आहे. त्यात त्याला अनोळखी व्यक्तीकडून ई-मेल आला असून त्यामध्ये काही दिवसांपासून तो पोर्न संकेतस्थळांना भेट देत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच त्याने कोणते व्हिडीओ पाहिले, कोणासोबत चॅट केले, चॅटिंगदरम्यान घेतलेले आक्षेपार्ह छायाचित्रही आमच्याकडे असल्याचा दावा या ई-मेलमध्ये करण्यात आला होता. संबंधित माहिती ई-मेल कॉन्टॅक्‍ट लिस्टमधील ओळखीच्या व्यक्तीपुढे जाहीर न करण्यासाठी बिटकॉईनमध्ये खंडणीची मागणी करण्यात आली होती. याशिवाय तक्रारदाराला घाबरवण्यासाठी त्याने पोर्न संकेतस्थळे पाहण्यासाठी वापरलेला ई-मेलचा पासवर्डही तेथे नमूद करण्यात आला होता. या तक्रारदाराप्रमाणे किमान पाच तक्रारी पोलिसांना आल्या आहेत.

अनेक जण सर्रास पोर्न पाहतात; मात्र याबाबत कोणीही जाहीर वाच्यता करत नाही. याचाच फायदा घेऊन सायबर गुन्हेगारांनी बदनामीची भीती दाखवून खंडणी मागण्याची नवीन पद्धती अवलंबली  आहे, अशी माहिती गुन्हे शाखेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. हे आरोपी संकेतस्थळ चालवणाऱ्यांपैकीच असण्याची शक्‍यता आहे. या प्रकारच्या खंडणीमध्ये पोर्न व्हिडीओ डाऊनलोड करताना साईन अपचा पर्याय दिला जाते. त्यावर क्‍लिक करून माहिती अपलोड केल्यानंतर तक्रारदार आरोपींच्या जाळ्यात अडकतो. 

भीती हेच प्रमुख अस्त्र
‘भीती’ या प्रमुख अस्त्राचा वापर सायबर गुन्हेगार करत आहेत. खंडणीची नवीन कार्यपद्धती समाजासाठी धोका आहे; मात्र समाजात बदनामीच्या भीतीने अनेक जण गुन्हा दाखल करण्याचे धाडस दाखवत नाहीत. यामुळे अशा प्रकरणांचे गांभीर्य कळत नसल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. याशिवाय खंडणीही बिटकॉइनमध्ये मागितली जाते; तसेच ई-मेल पाठवण्यासाठी प्रोक्‍सी सर्व्हरचा वापर करण्यात येतो त्यामुळे आरोपीपर्यंत पोहोचणे तपास यंत्रणांसाठी अशक्‍यप्राय गोष्ट आहे.

Web Title: Ransom threat from porn site