बळी देण्याची धमकी देऊन तरुणीवर बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 मे 2017

मोखाड्याच्या नगराध्यक्षासह सात जणांना अटक

मोखाड्याच्या नगराध्यक्षासह सात जणांना अटक
ठाणे - नोकरीचे प्रलोभन दाखवून महाविद्यालयीन तरुणीशी जबरदस्तीने विवाह करणाऱ्या भोंदूबाबाने तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची; तसेच या प्रकरणाची वाच्यता केल्यास देवीला बळी देण्याची धमकी देत तिचे पुन्हा शारीरिक शोषण केल्याची घटना मोखाडा तालुक्‍यात उघडकीस आली. या प्रकारात त्याला मोखाड्याच्या नगराध्यक्षा मंगला चौधरी यांनीही साथ दिली. याप्रकरणी पोलिसांनी दहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, चौधरी यांच्यासह सात जणांना अटक केली आहे.

मूळव्याधाच्या त्रासामुळे त्रस्त झालेली ही तरुणी काही महिन्यांपूर्वी उपचारासाठी त्र्यंबकमुनी मंगलमुनी दास या बाबाकडे गेली होती. त्या वेळी त्याने तिला नोकरीचे प्रलोभन दाखवले. तिचा विश्‍वास संपादन केल्यानंतर त्याने तिला जव्हार तालुक्‍यातील खोडाळा-खुडेद तसेच गुजरातमधील बलसाड येथे नेले. तेथे त्याने तिच्यावर वारंवार बलात्कार केला. त्यादरम्यान त्याने तिच्याशी जबरदस्तीने विवाहही केला. या प्रकाराची वाच्यता केल्यास देवीला बळी देण्याची धमकी देत तिला भिलाड स्थानकाजवळील खोलीत डांबून तिचे पुन्हा शारीरिक शोषण केले. या प्रकारात या बाबाला मंगला चौधरी यांच्यासह नऊ जणांनी मदत केल्याचे पीडित तरुणीने तक्रारीत नमूद केले आहे.

याप्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली असून, फरारी असलेल्या तिघांचा शोध सुरू असल्याचे मोखाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक डी. पी. भोये यांनी सांगितले.

Web Title: rape case in thane