नॅशनल पार्कमधील दुर्मिळ कर्करोग झालेल्या वाघाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 मे 2019

मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील यश नावाच्या वाघाला दुर्मिळ कर्करोग झाल्याचे निदर्शनास आले होते. ​पण आता यशची कर्करोगाशी ही लढाई संपली आहे....

मुंबई : बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील यशला (11) दुर्मिळ कर्करोग झाला होता. रेबडोमायोचारकोमा या दुर्मिळ कर्करोगाने यश आजारी होता. आठवड्याभरापूर्वीच यश या दुर्मिळ कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. पण यशची कर्करोगाशी लढाई अखेर संपली आणि यशने आज अखेरचा श्वास घेतला.

कर्करोगाचे निदान झाल्यानंतर यशचे सफारीतून पर्यटकांना होणारे दर्शन आता कायमचे बंद झाले होते. उद्यानातील पलाश आणि बसंती वाघांच्या जोडीच्या मिलनातून यशचा जन्म झाला होता. यश वयात आल्यानंतर त्याच्या मिलनासाठी खास नागपूरहून बिजली आणि मस्तानी या दोन वाघिणीही उद्यान प्रशासनाने आणल्या होत्या. परंतु दोघींसोबत यशचे मिलन यशस्वी झाले नाही.

गेल्या वर्षापासून यशच्या तोंडाला गाठ येत असल्याचे उद्यानातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. ही गाठ तातडीने शस्त्रक्रियेतून काढण्यात आली व तपासणीसाठी गोरेगाव येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी पाठवण्यात आली. या तपासणीचा अहवाल प्रलंबित असतानाच जुलै महिन्यात पुन्हा यशच्या तोंडाजवळ गाठ दिसून आली. तेव्हा मात्र यशला कर्करोग झाल्याचा संशय पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांंना आला. ही गाठही शस्त्रक्रियेतून काढून पशुवैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला. यातील पहिल्या शस्त्रक्रियेतून काढलेल्या गाठीच्या नमुन्याचा अहवाल आठवड्याभरापूर्वी उद्यानाला मिळालं तेव्हा यशला दुर्मिळ कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाले. रेबडोमायोचारकोमा या दुर्मिळ कर्करोगाने यश आजारी असून, तो बऱ्यापैकी यशच्या शरीरात पसल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यामुळे यशला सफारीत न सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 

पहिल्या शस्त्रक्रियेनंतर यशने खाणेही कमी केल्याने त्याचे वजन सत्तर किलोने कमी झाले होते. पहिल्या शस्त्रक्रियेअगोदर यशचे वजन दोनशे वीस किलोएवढे होते. नंतर यशचे वजन दीडशे किलोपर्यंत खाली उतरले होते. कोंबडी आणि थोडेफार म्हशीचे मटण हे त्याचे खाद्य होते. या अगोदरही उद्यानातील 'रॅबॅका' या पांढऱ्या वाघीणीचा त्वचा कर्करोगाने तीन वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. 

रेबडोमायोचारकोमा कर्करोगाबाबत :
हा कर्करोग शरीरातील साध्या पेशी किंवा स्नायूंवर होतो. स्नायूंसह हाडे तसेच स्नायूतंतूमध्येही हा कर्करोग आढळतो. म्हणूनच त्याला रेबडोमायोचारकोमा असे संबोधले जाते. प्राण्यांमध्ये हा कर्करोग आढळून आल्यास त्या भागावरील गाठ सातत्याने काढावी लागते. हा कर्करोग आढळून आल्यानंतर तीन ते चारच वर्ष प्राणी जगू शकतो, अशी माहिती गोरेगाव येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rare cancer to a Tiger in the National Park Mumbai