मराठी तरुण शिकताहेत रास दांडिया 

मराठी तरुण शिकताहेत रास दांडिया 

ठाणे - नवरात्रोत्सवातील नऊ दिवसांमध्ये होणाऱ्या रास दांडिया खेळण्यासाठी कोरिओग्राफर्सच्या मार्गदर्शनाखाली नृत्याचे धडे गिरवण्याकडे सर्वच वयोगटांतील व्यक्तींचा कल वाढल्याचे पाहायला मिळते. नवरात्रीच्या तोंडावर मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण आणि डोंबिवली शहरात गरबा प्रशिक्षणाचे वर्ग मोठ्या प्रमाणावर सुरू झाले आहेत. गुजराती स्त्री-पुरुषांमध्ये जन्मत:च गरब्याची लय असते असे आपल्याला नवरात्रीच्या काळात पाहायला मिळते. त्यांच्याप्रमाणेच आपल्यालाही लय पकडता यावी म्हणून इतर प्रांतीय नागरिक खास करून गरब्याच्या वर्गांना हजेरी लावू लागले आहेत. त्यात मराठी नागरिकांचा टक्का ७० टक्के असून इतर प्रांतीय ३० टक्के असल्याचे कोरिओग्राफरने सांगितले. मराठी तरुणांचे प्रमाण अधिक असल्याचेही त्यांनी सांगितले.

गुजरातमधील प्रसिद्ध लोकनृत्य गरबा सातासमुद्रापार पोहोचला आहे. गुजराती समाजाशिवाय इतर भाषकांनाही गरब्याची भुरळ पडली आहे. पूर्वी केवळ तरुण मंडळी नवरात्रोत्सवाआधी गरबा वा दांडियाचे प्रशिक्षण घेण्यास येत; मात्र हळूहळू अगदी पाच वर्षांच्या मुलांपासून ५० वर्षीय ज्येष्ठ नागरिकही त्यात उत्साहाने सहभागी होऊ लागले आहेत. शाळकरी मुले, गृहिणी आणि नोकरदार मंडळी असा सर्वांचाच समावेश असल्याचे कोरिओग्राफर सांगतात. उत्सवांमध्ये जाऊन तालाशिवाय गरबा खेळण्याऐवजी त्यातील नजाकत समजून तो सादर करता यावा म्हणून खास करून मंडळी प्रशिक्षण घेऊ लागली आहेत. त्यातूनच अनेक ठिकाणी खास गृहिणी व नोकरदार महिलांसाठी गरब्याचे विशेष वर्ग सुरू झाले आहेत. लोकांचा कल लक्षात घेता शहरात विविध ठिकाणी नृत्य प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन केले गेले आहे. त्यामध्ये गरबा नृत्य, दांडिया रास, गुजराती आणि मराठी स्टाईलचे गरबा नृत्य असे विविध प्रकार शिकवले जात आहेत. त्याचप्रमाणे शारीरिक तंदुरुस्तीसाठीही गरब्याच्या वर्गांना जाण्याचा नागरिकांचा कल असल्याचे कोरिओग्राफर सांगतात.

एका दिवसापासून ते १० दिवसांपर्यंतच्या कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत. काही ठराविक स्टेप्स शिकण्यासाठी दिवसानुसार १००० ते ३००० रुपये आकारले जातात.संपूर्ण डान्स बसवायचा असेल तर आठवड्याभरासाठी पाच ते आठ हजार आकारले जात असल्याची माहिती कोरिओग्राफरने दिली.

गुजराती गीतांचा अर्थ समजून घेत त्यावर तालबद्ध लयीत नृत्य सादर करण्यासाठी मुले क्‍लासला येऊन प्रशिक्षण घेऊ लागली आहेत. हिंदी चित्रपटातील आणि गुजराती गीतांवर ते प्रशिक्षण घेतात.
- सोमनाथ अरिहंत, कोरिओग्राफर

लयबद्ध गरबा नृत्य करण्याकडे नागरिकांचा ओढा असतो. त्यामुळे एकदिवसीय किंवा पाच दिवसीय शिबिरात नागरिक सहभागी होतात. मराठी तरुणांचे प्रमाण जास्त म्हणजेच ७० टक्के आहे.
- राधा ठक्कर, कोरिओग्राफर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com