Mrs. मुख्यमंत्री रश्मी ठाकरे; सत्तासंघर्षात उद्धव ठाकरेंची सावली!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 28 November 2019

बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना उत्तराधिकारी घोषित करावं यामागेही रश्मी ठाकरेच असल्याचं बोललं जातं. राज ठाकरे जेव्हा शिवसेना सोडून गेले तेव्हा उद्धव ठाकरेंसोबत रश्मी ठाकरे खंबीरपणे उभ्या राहिल्या...

महाराष्ट्रातील सत्तेच्या सारिपाटावर आता नवी समीकरणे निर्माण झाली आहेत. आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात रिमोट कंट्रोल म्हणून वावर असणारे ठाकरे घराणे आता थेट सत्तेत सहभागी झाले आहे.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री तर आदित्य आमदार म्हणून विधानसभेत प्रवेशकर्ते झाले आहेत. सत्तासमीकरणाऱ्या या नांदीत एक नाव मात्र कायमच पडद्यामागे घेतले जाते ते म्हणजे रश्‍मी उद्धव ठाकरे. हो.. अगदी बरोबर आहे. अनेक सार्वजनिक कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांच्याबरोबर सावलीप्रमाणे असणाऱ्या रश्‍मी ठाकरे यांनी यावेळच्या सत्तासमीकरणात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शिवसेनेच्या त्या ‘माँसाहेब-२’ म्हणून ओळखल्या जात आहेत.

Image result for balasaheb and meena thackeray

मूळच्या डोंबिविलीच्या असलेल्या पाटणकर यांची महाविद्यालयीन काळात उद्धव ठाकरे यांची भेट झाली. दोघेही ‘जे. जे. आर्ट स्कूल’चे विद्यार्थी. तिथेच त्यांचे प्रेम जुळले आणि विवाहही झाला. पाटणकरांच्या ठाकरे झाल्यावर रश्‍मी यांनी सुरुवातीच्या काळात ‘मातोश्री’ची आणि अर्थात सासरे बाळासाहेब यांची कार्यपद्धती समजून घेतली आणि त्याप्रमाणे शांतपणे पावले उचलत नवऱ्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्यास सुरुवात केली. आता त्यांच्याकडे केवळ ‘मिसेस मुख्यमंत्री’ म्हणून पाहता येणार नाही तर त्या एका आमदाराच्या 'मातोश्री'ही आहेत.

पाटणकर ते ठाकरे; असा आहे रश्मी वहिनींचा प्रवास!

Image result for rashmi thackeray uddhav thackeray

आदित्यला सुरुवातीपासून राजकारण आणण्यासाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतले. त्याच्या पहिल्यावहिल्या आमदारकीच्या निवडणुकीत प्रचाराची मोठी धुरा त्यांनी सांभाळली. राजकीय क्षेत्रातील अचूक जाण आणि माहिती ठेवणाऱ्या रश्‍मी ठाकरे या यशस्वी उद्योजिकाही आहेत. ‘सामवेद रिअल प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘सहयोग डिलर्स प्रायव्हेट लिमिटेड’ या दोन मोठ्या फर्मच्या त्या संचालक आहेत. याशिवाय इलोरिया सोलर, हिबिकस फूड आणि कोमो स्टॉक्‍स अॅड प्रॉपर्टीज या तीन कंपन्यात त्या आदित्य यांच्यासह सहसंचालकही आहेत.

Image result for rashmi thackeray aditya thackeray

महाराष्ट्राच्या राजकारणात आजपर्यंत ‘मिसेस मुख्यमंत्री’ म्हणून ठसठशीत नाव कायम चर्चेत असते ते शालिनीताई पाटील यांचे यानंतर दीर्घ काळानंतर चर्चेत नाव आले ते अमृता फडणवीस यांचे. अर्थात यापैकी शालिनीताई यांचे नाव राजकीय वारसदार म्हणून जास्त चर्चेत होते. त्यामुळे आगामी काळात रश्‍मी ठाकरे राजकीय वारसदार म्हणून भूमिका बजावणार की पडद्यामागे राहून पतीच्या मागे खंबीरपणे उभ्या राहणार हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. आदित्य याच्या राजकीय कारकिर्दीसाठी तरी त्या ‘मॉंसाहेब-२’ म्हणून धुरा सांभाळतील अशी शक्‍यता जास्त व्यक्त होत आहे.

अखेर राज यांना आला मातोश्रीहून निमंत्रणाचा फोन!

रश्मी ठाकरे... शिवसेनेच्या महिन्याभराच्या सत्तासंघर्षात ‘माँसाहेब-२’ म्हणून समोर येतायंत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांची ओळख माँसाहेब म्हणून शिवसैनिकांसह अवघ्या महाराष्ट्राला आहे. पण आता मातोश्रीत रश्मी ठाकरेंच्या रूपानं ‘माँसाहेब-२’ अवतरल्यात आहेत, असं म्हटले तर वावगं होणार नाही.

रश्मी ठाकरे.. उद्धव ठाकरेंच्या अर्धांगिनी.. उद्धव यांच्या रणनीतीकार.. त्यांच्या मार्गदर्शक.. त्यांच्या खंद्या समर्थक.. असं म्हटलं जातं की वर्षा बंगल्याची महत्त्वाकांक्षा उद्धव यांनी बाळगली ती रश्मी ठाकरेंच्या आग्रहावरनंच. ग्राऊंड लेव्हलला पक्षात काय परिस्थिती आहे याचा लेखाजोखाच रश्मी ठाकरे ठेवतात.

Image result for rashmi thackeray uddhav thackeray

भाजपमागे शिवसेनेची फरफट होतेय, आता पुरे.. ही तळागाळातल्या शिवसैनिकांची भावना रश्मी ठाकरेंच्या माध्यमातून मातोश्रीपर्यंत पोचल्याचं बोललं जातं. केवळ भाजपशी दोन हात कऱण्याबाबत नाही, तर पक्षांतर्गत होणाऱ्या बारीक-सारीक हालचालींवर रश्मी ठाकरेंची नजर असते. कोणतीही नकारात्मकता उद्धव ठाकरेंपर्यंत त्या पोचू देत नाहीत. म्हणूनच शिवसैनिकांसाठी रश्मी ठाकरे माँ-साहेब ठरतायत.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना उत्तराधिकारी घोषित करावं यामागेही रश्मी ठाकरेच असल्याचं बोललं जातं. राज ठाकरे जेव्हा शिवसेना सोडून गेले तेव्हा उद्धव ठाकरेंसोबत रश्मी ठाकरे खंबीरपणे उभ्या राहिल्या. शिवसेना महिला आघाडीची धुरा सांभाळण्याचा अनुभव असलेल्या रश्मी ठाकरे नीता अंबानींपासून ते ऐश्वर्या राय-बच्चन कुणासोबतही अगदी सहजपणे मिसळतात.

Related image

रश्मी ठाकरेंना गझल गायनाचीही आवड आहे. मुलगा आदित्य व तेजसच्या प्रत्येक गोष्टीत त्या सहभागी असतात. त्यांना प्रोत्साहन देतात. राजकारणात जरी त्या प्रत्यक्षपणे सहभागी होत नसल्या तरी शिवसेना महिला आघाडीच्या त्या अध्यक्षा होत्या हे लक्षात घेण्यासारखे आहे. भाजपविरोधात शिवसेनेनं जी ठाम भूमिका घेतली त्यात रश्मी ठाकरेंचा पूर्वानुभव कामी आल्याचीही चर्चा आहे. शिवसेनेच्या मुख्य रणनीतीकार असल्या तरीही पडद्याआड राहणंच रश्मी ठाकरे पसंत करतात. म्हणूनच पडद्यामागून सूत्र चालवणाऱ्या रश्मी ठाकरे भविष्यात कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rashmi Thackeray is supporting pillar of CM Uddhav Thackeray