नाहटांना डावलल्याने शिवसैनिकांचा वाशीत रास्तारोको 

rastaroko by shivsena party workers at Navi mumbai
rastaroko by shivsena party workers at Navi mumbai

नवी मुंबई : शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांना महायुतीतर्फे बेलापूर मतदार संघातील उमेदवारी नाकारल्यामुळे संतप्त नाहटा समर्थक शिवसैनिकांनी वाशीत रास्तारोको केला. वाशीतील मध्यवर्ती कार्यालयासमोरील सेक्‍टर नऊच्या रस्त्यावर शिवसैनिकांनी उतरून जोरदार घोषणाबाजी करत रस्ता आडवून धरला. परंतु यादरम्यान पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुन्हा रस्त्यावरील वाहतूक सुरू झाली. 

बेलापूर मतदार संघातून शिवसेनेतर्फे विजय नाहटा यांनी मागील तीन वर्षांपासून तयारी सुरू केली आहे. बेलापूर मतदार संघातील नागरीकांचे विविध प्रश्‍न आणि समस्या सोडवण्याव्यतिरीक्त ज्येष्ठ नागरीकांसाठी आरोग्य शिबीरे, चष्मे वाटप, तरूणांसाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम आदी उपक्रम राबवले. याखेरीज बेलापूर मतदार संघातील विखुरलेल्या पक्षाला सावरण्याचे मोठे काम त्यांनी केले. परंतु बेलापूर मतदार संघातील जागा भाजपच्या वाट्याला गेल्यामुळे नाहटा यांना उमेदवारी मिळाली नाही. नाहटा यांना उमेदवारी नाकारल्यामुळे शिवसैनिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. तसेच नाहटा यांना उमेदवारी दिली जात नसेल तर गणेश नाईकांचे काम करणार नाही असा काही शिवसैनिकांनी पवित्रा घेतला होता.

तसेच 200 पदाधिकाऱ्यांनी राजीनामेही सोपवले आहेत. त्याबाबत बुधवारी भूमिका ठरवण्यासाठी वाशीतील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला आलेल्या शिवसैनिकांचे प्रमाण वाढल्यामुळे अखेर काही शिवसैनिक रस्त्यावर उभे राहीले. हळूहळू गर्दी वाढत गेल्याने अखेर शिवसैनिकांनी रस्त्यावर वाहने आडवून धरली. तसेच काही शिवसैनिकांनी निषेध व्यक्त करण्यासाठी जोरदार घोषणाबाजी केली. शिवसैनिक काही काळ रस्त्यावर उतरल्यामुळे कोपरखैरणेहून वाशीकडे जाणारी वाहतूक बंद झाली होती. 

बेलापूरची जागा शिवसेनेला मिळणार असे वाटत असल्याने शिवसैनिकांनी मनापासून तयारी केली होती. आता उमेदवारी न मिळाल्यामुळे अखेर पक्षांचे काम करणार आहे. मात्र कार्यकर्त्यांच्या भावनाही महत्वाच्या आहेत. 
- विजय नाहटा, उपनेते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com