भोजपुरी सुपरस्टार रवी किशनला दीड कोटींचा गंडा

अनिश पाटील
सोमवार, 3 डिसेंबर 2018

मुंबई - भोजपुरी सुपरस्टार रवी किशनला आलिशान घर देण्याच्या नावाखाली एका बांधकाम व्यावसायिकाने दीड कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रवी किशन व आणखी एका आर्थिक सल्लागार व्यावसायिकाची फसवणूक केल्याप्रकरणी या बांधकाम व्यावसायिक कंपनीच्या तीन संचालकांविरोधात आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे.

अभिनेता रवींद्र श्‍यामनारायण शुक्‍ला ऊर्फ रवी किशन याला जुहू येथील प्रकल्पात घर देण्याचे आश्‍वासन देऊन फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम कंपनीचे संचालक जितेंद्र जैन, जिनेंद्र जैन व करण शाह यांच्याविरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार आली होती. याच प्रकल्पात सुनील नायर या व्यावसायिकाची साडेसहा कोटींची फसवणूक झाल्याची तक्रार होती. त्यामुळे ही दोन्ही प्रकरणे एकत्र करून आठ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नायर यांच्या तक्रारीनुसार, सांताक्रूझ पश्‍चिम येथील कमला लॅंडमार्कच्या प्रकल्पातील 4015 चौरस फुटांचा व्यावसायिक गाळा त्यांनी पत्नीच्या नावे खरेदी केला होता. त्यासाठी त्यांनी तीन कोटी 10 लाख रुपये दिले होते. त्या प्रकल्पाला भोगवटा प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे जुहू येथील सिद्धांत प्रकल्पात घर घ्यावे, असे बांधकाम व्यावसायिकाकडून सांगण्यात आले. हा प्रकल्प भागीदारीत सुरू असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे नायर यांनी सांताक्रूझ येथील गाळ्याऐवजी जुहूतील प्रकल्पात दोन सदनिका घेण्याचे ठरवले. त्यानुसार गाळा परत केल्याबद्दल नायर यांना या बांधकाम व्यावसायिकाकडून व्याजासह साडेसहा कोटी रुपये मिळाले. जानेवारी 2015 मध्ये नायर यांनी 14 व्या मजल्यावरील दोन सदनिका व चार वाहनांच्या पार्किंगसाठी मिळून साडेसहा कोटी रुपये दिले. परंतु, त्यांना आतापर्यंत सदनिकांचा ताबा मिळाला नाही व पैसेही मिळाले नाहीत.

Web Title: Ravi Kishan Cheating Crime