रवी पुजारीच्या नावाने विकसकाला धमकी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

मुंबई - वाकोल्यातील प्रसिद्ध विकसकाला कुख्यात गुंड रवी पुजारीच्या नावाने खंडणीचा दूरध्वनी आल्याने खळबळ उडाली आहे. तक्रारदाराचा एका व्यक्तीशी असलेला वाद मिटवण्याकरिता दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने १२ कोटींची खंडणी मागितली. संगणक ॲप्लिकेशनद्वारे त्याने हा दूरध्वनी केला होता, अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.

इरफान सातमकर (नाव बदलले आहे) या विकसकाने उपनगरात झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत काही इमारती बांधल्या आहेत. इरफान यांचा एका व्यावसायिकाशी वाद आहे. तो मिटवण्यासाठी काही दिवसांपासून रवी पुजारीच्या नावाने त्यांना धमकी येत आहे. तसेच त्याने १२ कोटींची खंडणीही मागितली. ती न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही त्यांना देण्यात आली. या दूरध्वनीनंतर अखेर इरफान यांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार ८ एप्रिलला वाकोला पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखेच्या कक्ष- ८ कडे या प्रकरणाचा तपास देण्यात आला.

आरोपीने आपण रवी पुजारी बोलत असल्याचे सांगून इरफान यांना धमकावले. दूरध्वनीवरून धमकावणारा पुजारीच आहे का, याची पडताळणी सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणात इरफान यांच्या ओळखीच्या व्यक्तीचाही सहभाग असल्याचा संशय आहे. त्याच्यामार्फतच इरफान यांची महत्त्वपूर्ण माहिती धमकी देणाऱ्यापर्यंत पोहोचली आहे. त्यानुसार तपास सुरू असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. प्राथमिक तपासात दूरध्वनी करण्यासाठी आरोपीने ॲप्लिकेशनचा वापर करून त्याद्वारे हा इंटरनेट कॉल असल्याचे दाखवण्यात आले आहे.

मुंबईतील खंडणीचे गुन्हे
प्रादेशिक परिमंडळ    २०१७    २०१६
दक्षिण    २०    २६
पूर्व    २५    ६३
पश्‍चिम    ६१    ४९
उत्तर    ४६    ४६
मध्य    ४१    ४२

Web Title: Ravi Pujari's name threatens the developer

टॅग्स