दानवे 'मातोश्री'वर; चर्चेला उधाण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

मुंबई - शिवसेनेने हात पुढे केल्यास युती होऊ शकते, असे संकेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिल्यानंतर राज्यातील प्रमुख महापालिकेत पुन्हा युतीची चर्चा सुरू झाली. त्यानंतर अचानक संध्याकाळी दानवे "मातोश्री'वर पोहचले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. मुलाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी दानवे "मातोश्री'वर गेले होते. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच त्यांनी फोटोसाठी हसरी पोझ दिली. या हास्यामागे युतीची समीकरणे जुळणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

राज्यातील 10 महापालिकांची निवडणूक शिवसेना-भाजपनेच गाजवली. या निवडणुकीच्या मैदानात औकात दाखवण्यापासून कोथळा काढण्याच्या घोषणा करण्यात आल्या. भ्रष्टाचाराचे आरोप-प्रत्यारोप झाले. मात्र, मतदान होताच सर्व वातावरण बदलले. शिवसेनेने प्रस्ताव पुढे केल्यास युती होऊ शकते, असे संकेत दानवे यांनी दिले. त्यानंतर पुन्हा सर्वत्र शिवसेना-भाजप एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली. ही चर्चा सुरू असताना दानवे अचानक संध्याकाळी "मातोश्री'वर पोहचले. त्यांच्या मुलाचा विवाह 2 मार्चला होणार असून त्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी ते "मातोश्री'वर गेल्याचे सांगण्यात आले. मात्र, या भेटीनंतर शिवसेना-भाजपत पुन्हा मैत्री जमते काय, अशी चर्चा सुरू झाली. दोन्ही नेत्यांनी एकत्र येऊन हसतमुख छायाचित्रासाठी पोझही दिली. त्यामुळे या चर्चेला अधिकच उधाण आले.

Web Title: ravsaheb danave on matoshri