शिवसेनेच्या रणरागिणींची बंडखोरी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑक्टोबर 2019

शिवसेनेपुढे त्यांच्या रणरागिणींनीच आव्हान दिले आहे. थेट मातोश्रीच्या मतदारसंघातच आमदार तृप्ती सावंत यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे; तर वर्सोवामधून नगरसेविका राजूल पटेल यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

मुंबई : शिवसेनेपुढे त्यांच्या रणरागिणींनीच आव्हान दिले आहे. थेट मातोश्रीच्या मतदारसंघातच आमदार तृप्ती सावंत यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे; तर वर्सोवामधून नगरसेविका राजूल पटेल यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

वांद्रे पूर्व मतदारसंघात महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांना उमेदवारी दिली; तर पती बाळा सावंत यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा पराभव करून तृप्ती सावंत आमदार झाल्या होत्या. त्यांनी या मतदारसंघातून उमेदवारीचा दावा केला होता. मुंबईतील सर्व विद्यमान आमदारांना शिवसेनेने पुन्हा संधी दिली; मात्र तृप्ती सावंत यांना उमेदवारी नाकारली.

त्यामुळे त्यांनी आज अपक्ष अर्ज दाखल केला. शिवसेनेच्या जोगेश्‍वरी येथील नगरसेविका राजूल पटेल यांनी वर्सोवा मतदारसंघातून भाजपच्या भारती लव्हेकर यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या मतदारसंघात मुस्लिम आणि उत्तर भारतीय मतदारांची सर्वाधिक संख्या आहे. या दोन्ही समाजांमध्ये पटेल यांची चांगली पकड आहे. त्यामुळे त्यांनी अर्ज मागे न घेतल्यास लव्हेकर यांना निवडणूक कठीण जाण्याची शक्‍यता आहे. 

पटेल यांना मातोश्रीचे आदेश 
अंधेरी पूर्वेला शिवसेनेचे उमेदवार रमेश लटके यांच्या विरोधात भाजपचे माजी नगरसेवक मुरजी पटेल यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. त्यांना उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडले जावे, म्हणून पटेल यांना अपक्ष उमेदवारी भरण्यास मातोश्रीकडून सांगण्यात आलेले असावे, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rebellion of Shiv Sena warlords