पुनर्बांधणीला चालना मिळणार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

नवी मुंबई - शहरातील सिडको निर्मित मोडकळीस आलेल्या इमारतींमधील रहिवाशांसाठी संक्रमण शिबिर उभारण्यास अखेर महापालिका प्रशासनाने परवानगी दिली आहे. पुनर्विकासाच्या जागेवरील उर्वरित जागेत संक्रमण शिबिर उभारण्यास पालिकेच्या नगररचना विभागाने वाशीतील विकसकांना परवानगी दिली आहे.

नवी मुंबई - शहरातील सिडको निर्मित मोडकळीस आलेल्या इमारतींमधील रहिवाशांसाठी संक्रमण शिबिर उभारण्यास अखेर महापालिका प्रशासनाने परवानगी दिली आहे. पुनर्विकासाच्या जागेवरील उर्वरित जागेत संक्रमण शिबिर उभारण्यास पालिकेच्या नगररचना विभागाने वाशीतील विकसकांना परवानगी दिली आहे.

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

पालिकेच्या या परवानगीमुळे फक्त संक्रमण शिबिरांअभावी अनेक वर्षांपासून रखडलेले पुनर्बांधणीचे प्रकल्प मार्गी लागणार आहेत. तसेच रहिवाशांना तात्पुरती जागा उपलब्ध होणार असल्याने गेली 20 वर्षे आपल्या मूळ वास्तव्यापासून दूर राहणाऱ्या वाशीतील जेएन-2 टाईप इमारतींमधील 150 कुटुंबांना पुन्हा त्यांच्या मूळ जागेवर राहता येणार आहे. त्यांच्यासहित नवी मुंबईतील धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या सुमारे चार हजारपेक्षा जास्त कुटुंबांना थेट फायदा होणार आहे. 

वाशीतील सिडको निर्मित इमारतींच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे अल्पावधीतच त्या राहण्यास धोकादायक ठरल्यामुळे सेक्‍टर- 10 मधील श्रद्धा आपार्टमेंट व सेक्‍टर- 9 मधील अवनी अपार्टमेंटमधील 150 कुटुंबांना इमारत रिकामी करावी लागली आहे. त्यानंतर त्यांना सर्व कुटुंबांना जुईनगर येथील सिडकोच्या संक्रमण शिबिरात तात्पुरते वास्तव्यास पाठविण्यात आले होते. सिडकोच्या संक्रमण शिबिराचीही दयनीय अवस्था होत असल्याने ती घरेही यांना रिकामी करावी लागणार होती; मात्र पर्यायी वास्तव्यासाठी जागा नसल्याने बेघर होण्याची टांगती तलवार श्रद्धा व अवनी सोसायटीच्या रहिवाशांवर होती. या दोन सोसायट्यातील रहिवाशांप्रमाणे नवी मुंबईतील सुमारे शंभर पुनर्बांधणीचे प्रकल्प रखडले होते. यातील सर्व रहिवासी धोकादायक परिस्थितीत राहत होते. 

त्यामुळे नगररचना विभागाने श्रद्धा व अवनी या दोन्ही अपार्टमेंटच्या जागेवर संक्रमण शिबिर उभारण्यास संबंधित विकसकांना शनिवारी परवानगी दिली. या परवानगीमुळे आता श्रद्धा असोसिएशनच्या जागेवर विकसकाला सर्वसुविधांनी युक्त 350 घरांचे संक्रमण शिबिर उभारता येणार आहे. तसेच पुनर्बांधणी प्रक्रियेत गेलेल्या अवनी सोसायटीच्या भूखंडावरही 150 घरांची परवानगी पालिकेने दिली आहे. 

त्यामुळे या दोन्ही भूखंडांवर आता सुमारे पाचशे घरांचे संक्रमण शिबिर उभारण्यात येणार आहे. पालिकेने आहेत त्याच जागेवर संक्रमण शिबिर तयार करण्याची विकसकांना परवानगी दिल्यामुळे गेल्या 20 वर्षांपेक्षा अधिक काळ घरांच्या पुनर्बांधणीकडे डोळे लावून बसलेल्या श्रद्धा व अवनी सोसायटीतील विस्थापित रहीवाशांना हक्काच्या घरांची निर्मिती होताना पाहता येणार आहे. त्याचप्रमाणे आता शहरातील शंभरपेक्षा जास्त सोसायट्यांना पालिकेतर्फे संक्रमण शिबिर उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे सुमारे दीड हजारपेक्षा जास्त लोकांना तात्पुरते छत मिळणार आहे. 

शहरातील मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्बांधणीचे प्रकल्प मार्गी लागावेत, याकरिता विकासकांना संक्रमण शिबिरासाठी जागा उपलब्ध करून द्यायचा प्रस्ताव होता; परंतु इतर मोकळ्या जागी विरोध दर्शवल्यामुळे अखेर आहे त्याच ठिकाणच्या भूखंडांवर संक्रमण शिबिर उभारण्याची परवानगी नगररचना विभागाने दिली आहे. 
- ओवेस मोमीन, उपसंचालक, नगररचना विभाग 

गेल्या 20 वर्षांपासून आम्ही संक्रमण शिबिरात राहतो. आमच्या हक्काच्या घरापासून आम्ही वंचित होतो. मात्र आता आम्हाला हक्काचे घर आमच्या डोळ्यादेखत पाहण्याची संधी मिळाल्यामुळे आयुक्त डॉ. एन. रामास्वामींचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. 
- जयवंत गावडे, श्रद्धा ओनर्स अपार्टमेंट 

शह-काटशह 
वाशीतील मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्बांधणीकरिता आणि संक्रमण शिबिराच्या निर्मितीसाठी शिवसेनेचे नगरसेवक किशोर पाटकर हे गेली 20 वर्षांपासून पाठपुरावा करीत आहेत. त्यांच्या पाठपुराव्यानंतरच आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी शहरातील वापरात नसलेल्या मोकळ्या जागा, उद्यानातील मोकळ्या जागांवर संक्रमण शिबिरास मान्यता देण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे आणला होता. मात्र त्याला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी जोरदार विरोध केल्यामुळे प्रस्ताव फेटाळून पाटकर यांना शह देण्याचा प्रयत्न होता; परंतु आता आहे त्याच भूखंडांवरील मोकळ्या जागेवर संक्रमण शिबिर उभारण्यास परवानगी दिल्यामुळे "शह'वर "काटशह' मिळाला आहे.

Web Title: Rebuilding will boost