नवी मुंबईत रेकॉर्ड ब्रेक पाऊस; अवघ्या सात तासांत 210 mm पावसाची नोंद 

सुजित गायकवाड | Wednesday, 23 September 2020

हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर नवी मुंबईत मध्यरात्री बरसलेल्या मुसळधार पावसाने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे

नवी मुंबई : हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर नवी मुंबईत मध्यरात्री बरसलेल्या मुसळधार पावसाने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. रात्री 12 पासून सकाळी 7 वाजेपर्यंत तब्बल 210 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. कमी तासांत एवढा पाऊस पडण्याची या वर्षात पहिलीच वेळ आहे. 

मुंबई पालिकेच्या रुग्णालयांना पावसाचा फटका; नायर, कस्तुरबा, जे.जे. रुग्णालयात पाणीच पाणी, ओपीडीमध्ये रुग्णांचे हाल 

सध्या मान्सून परतीच्या वाटेवर असताना बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने  या आधीच दिला आहे. त्यानुसार नवी मुंबई, पनवेल आणि उरण परिसरात बुधवारी मध्यरात्रीपासून प्रचंड मेघगर्जनेसह पावसाने सुरुवात केली. एखाद्या ढगफुटीसारखा नवी मुंबईतील काही परिसरात पाऊस पडत होता. महापालिकेच्या आपत्ती निवारण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार नवी मुंबई शहरात 22 सप्टेंबर सकाळी 8.30 ते 23 सप्टेंबर सकाळी 8.30 या 24 तासांमध्ये एकूण 222.86 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यापैकी एकट्या बेलापूर आणि नेरूळ भागात अवघ्या सात तासांमध्ये तब्बल 210 मिमी इतक्या पावसाची पहिल्यांदाच नोंद झाली आहे. 

रस्ते गेले पाण्याखाली
नेरूळ आणि बेलापूर भागातील सखल भागात पाणी साचले होते. सीबीडी-बेलापूर बस डेपो, सेक्टर 3 ते 6, बेलापूर गाव, गॅरेज लाईन, नेरूळ मरीआई मंदिर परिसरात गुडघाभर पाणी साचले होते. सिडको भवन आणि कोकण भवनसमोरील रस्तेही पाण्याखाली गेले होते. तर पावसामुळे दोन झाडे कोसळल्याची नोंद महापालिकेत झाली आहे.

घरे, दुकानांत घुसले पाणी
मुसळधार पावसामुळे सीबीडी-बेलापूर येथील सेक्टर 4 च्या बाजारपेठेतील सर्व दुकानांमध्ये, एनएमएमटी बस डेपोसमोरील रहिवासी सोसायटीतील घरांमध्ये पाणी घुसले होते. 

'कामगार कायद्यातील बदल म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार'; हे तर भांडवलदारांचे सरकार, सचिन अहिर यांची टीका

जेएनपीटीकडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग बंद
नेरूळ-जेएनपीटी या देशातील सर्वांत लहान राष्ट्रीय महामार्गालाही पावसाचा फटका बसला. उलवे नदीला पूर आल्यामुळे पुराचे पाणी थेट महामार्गावर आल्याने रात्रभर  वाहतूक थांबवण्यात आली होती. त्यामुळे उरण-बेलापूर वाहतूक ठप्प पडली. जेएनपीटीकडे जाणारे सर्व कंटेनर या वाहतूक खोळंब्यात रात्रीपासून अडकून पडले होते.

------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )