नवी मुंबई महापालिकेत मेगाभरती

नवी मुंबई महापालिकेत मेगाभरती

नवी मुंबई  - आरोग्य व अग्निशमन विभागातील रिक्त पदांच्या भरतीला राज्य सकारने मान्यता दिली असल्याने या दोन विभागांतील ६८४ पदे काही महिन्यांत भरण्यात येणार आहेत. २५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर नवी मुंबई महापालिकेत नोकरभरती होणार आहे. राज्य सरकारच्या ऑनलाईन पोर्टलच्या मदतीने ही भरती होणार असल्याचे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले. 

तत्कालीन पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महापालिकेचा आकृतीबंध तयार करून राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला होता; परंतु त्यात काही त्रुटी आढळल्यामुळे पुन्हा आकृतीबंध तयार करण्याच्या सूचना नगरविकास विभागाने पालिकेला दिल्या होत्या. त्यानुसार आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली सुधारित आकृतीबंध पाठवण्यात आला होता. त्यावर महापालिकेच्या तीन हजार ९३५ पदांच्या आकृतीबंधाला सप्टेंबर २०१७ मध्ये राज्य सरकारने मंजुरी दिली; परंतु सेवाभरती प्रवेश प्रक्रिया व पदांची बिंदूनामावली मंजूर केली नसल्यामुळे आकृतीबंध मंजूर होऊनही पालिकेला नोकरभरती करता येत नव्हती. यामुळे आरोग्य व अग्निशमन विभागात मनुष्यबळाची चणचण जाणवत होती. रामास्वामी यांनी ही बाब लक्षात घेऊन आरोग्य व अग्निशमन या अत्यावश्‍यक सेवांना प्राधान्य देत संबंधित विभागांची सेवाभरती व बिंदूनामावली मंजूर करण्यासाठी प्रक्रिया राबवण्याचे आदेश प्रशासनाला दिले. त्यानुसार प्रशासनाने या दोन्ही विभागांचे सेवाभरती प्रवेश व बिंदूनामावली मंजूर करून घेतल्यामुळे या भरतीचा मार्ग मोकळा झाला. त्यानुसार आरोग्य विभागातील ४१३ व अग्निशमन विभागातील २७१ अशी ६८४ रिक्त पदांसाठी मेगाभरती होणार आहे. भरती प्रक्रिया राबवण्यासाठी प्रशासन विभागाच्या हालचालींना वेग आला आहे. 

आरोग्य विभागातील या जागा भरणार 
आरोग्य विभागात ‘क’ वर्गातील ९७४ मंजूरपदांपैकी ६१२ जागांवर कर्मचारी आहेत. त्यापैकी रिक्त ३७८ जागांवर भरती होणार आहे. कनिष्ठ अभियंता (बायोमेडिकल इंजिनिअर), सार्वजनिक आरोग्य परिचारिका, वैद्यकीय समाजसेवक, फिजिओथेरपिस्ट, नर्स, डायलिसीस तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सांख्यिकी सहायक, हेल्थ सुपरवायझर, अन्ननिरीक्षक आदी पदांचा यात समावेश आहे. ‘ड’ वर्गातील मंजूर १६० पैकी १३३ पदे नियुक्त असून उर्वरित २७ जागांवर भरती होणार आहे. यात आया, शिपाई, स्वच्छता कामगार, वॉर्डबॉय आदींचा समावेश आहे. ‘अ’ वर्गात आठ पदे मंजूर आहेत. यात न्यूरोसर्जन, युरोसर्जन, हृदयरोगतज्ज्ञ, न्यूरो फिजिशियन, प्लास्टिक सर्जन, वास्क्‍युलर सर्जन, ओव्हकॉलॉजिस्ट, गेस्ट्रो एन्ट्रीलॉजिस्ट अशी पदे आहेत. 

अग्निशमनमधील जागा
अग्निशमन विभागात ‘अ’ वर्गातील मुख्य अग्निशमन अधिकारी भरण्यात येणार आहे. ‘क’ वर्गातील विभागीय अग्निशमन अधिकारी, अग्निशमन केंद्र अधिकारी, ऑटोमोबाईल फोरमन, सहायक अग्निशमन केंद्र अधिकारी, निरीक्षक (बिनतारी संदेश), अग्निशमन प्रणेता, चालक यंत्रचालक, अग्निशामक, वाहनचालक, ज्युनिअर रेडिओ टेक्‍निशियन व सहायक मोटर मॅकेनिक अशी २७१ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com