ठाण्यात गॅरेजचालकांना लाल गालीचा! 

राजेश मोरे
Tuesday, 12 November 2019

शहरातील पदपथ अतिक्रमणमुक्त होण्यासाठी महापालिकेच्या वतीने गेल्या आठवड्यात सलग चार दिवस अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात आली होती. पण या कारवाईपासून नौपाडा प्रभाग समितीमधील अधिकारी मात्र अद्याप कोसो दूर असल्याचे दिसते. त्यामुळेच या काळात काही मोजक्‍या वेळेत फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई करताना कारडेकोर, गॅरेजचालकांना येथील अधिकाऱ्यांनी अद्याप लाल गालीचा घातला असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

ठाणे : शहरातील पदपथ अतिक्रमणमुक्त होण्यासाठी महापालिकेच्या वतीने गेल्या आठवड्यात सलग चार दिवस अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात आली होती. पण या कारवाईपासून नौपाडा प्रभाग समितीमधील अधिकारी मात्र अद्याप कोसो दूर असल्याचे दिसते. त्यामुळेच या काळात काही मोजक्‍या वेळेत फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई करताना कारडेकोर, गॅरेजचालकांना येथील अधिकाऱ्यांनी अद्याप लाल गालीचा घातला असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

ठाणे शहर वाहतूक कोंडीमुक्त होण्यासाठी शहरातील रस्तेरुंदीकरण वारंवार करण्यात आले आहे. यासाठी शेकडो नागरिकांना विस्थापित करण्यात आले. अशा वेळी किमान मुख्य शहरातील पदपथ तरी महापालिकेककडून मोकळा ठेवला जाईल, अशी अपेक्षा होती. पण महापालिकेने शहरात सलग चार दिवस अतिक्रमणविरोधी कारवाई केल्यानंतरही कारडेकोर चालकांनी पुन्हा एकदा रस्त्याचा ताबा घेण्यास सुरुवात केल्याने वाहनचालकांना वंदना सिनेमागृहासमोरील रस्त्यावर या कृत्रिम वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. 

ठाण्यातील वंदना सिनेमागृहासमोरील रस्ता हा तर गॅरेजचालक आणि कार डेकोरच्या दुकानांसाठी वर्षानुवर्षे आंदण दिल्याचा नागरिकांना अनुभव आहे. या रस्त्यावर कार डेकोरेशन करण्यासाठी ठाण्यासह भिवंडी, कल्याण आदी शहरातून मोठ्या प्रमाणात चार चाकी वाहने आणली जातात. या वाहनांपैकी एखाद दुसऱ्या वाहनाला दुकानात जागा करून दिल्यानंतर येथील पदपथ आणि रस्ता सर्रास या दुकानदारांकडून अडवला जाण्याची परंपरा आहे. 

वाहनांचे काम जास्त प्रमाणात असल्यास काही वाहने तर दिवसभर हा रस्ता अडवून असतात. अशा वेळी या दुकानदारांसमोरून महापालिकेच्या वतीने वाहने उचलणारी अतिक्रमण विभागाची गाडी वारंवार जात असते. पण त्यांच्याकडून येथील वाहनांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. 

या कारडेकोरबरोबरच याच परिसरात दुचाकी वाहनांना स्पेअर पार्ट पुरविणारी दुकाने आहेत. या दुकानांसमोरही वाहनांची रांगच रांग लागलेली असते. मुळात या परिसरातील पेट्रोल पंपावरील रिक्षा आणि इतर वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत असते. अशा वेळी येथील गॅरेजधारक आणि कार डेकोरच्या दुकानदारांनी रस्ता ताब्यात घेतल्याने या वाहतूक कोंडीत वाढ होत आहे. शनिवार आणि रविवारी तर शहरातील रस्ते मोकळे असतानाही वंदना सिनेमागृहासमोरच्या कृत्रिम वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते आहे. 

पदपथ कोणी अडवत असल्यास त्यावर महापालिकेकडून कारवाई केली जात असते. येथील कारडेकोर दुकानदारांवर यापूर्वी कारवाई करण्यात आलेली आहे. पुन्हा कोणी अशा प्रकारे रस्ता अडवत असल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. या परिसरात कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांना सोबत घेतले जाणार आहे. 
- अशोक बुरपुल्ले, 
अतिकमणविरोधी उपायुक्त 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Red carpet garage owner in Thane!