स्थानक पुनर्विकासाच्या निविदेला सुरुवात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे आणि पुणे स्थानकांचा समावेश

लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे आणि पुणे स्थानकांचा समावेश
मुंबई - लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे व पुणे स्थानकाच्या विकासासाठी मध्य रेल्वेची निविदा प्रक्रिया सुरू झाल्याची घोषणा महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी सोमवारी (ता.27) केली. जवळपास 650 कोटी रुपयांच्या या प्रकल्पात रेल्वेची एकाही रुपयाची गुंतवणूक नसेल. सार्वजनिक-खासगी भागीदारीतील या प्रकल्पातील कंपनीच्या निवड प्रक्रियेला दीड वर्षापेक्षा जास्त वेळ लागणार आहे.

देशभरातील ए वन व ए दर्जाच्या 400 हून अधिक स्थानकांच्या पुनर्विकासाची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी 2016 च्या अर्थसंकल्पी भाषणात केली होती. आता वर्षभरानंतर स्थानकांच्या पुनर्विकास प्रक्रियेच्या प्राथमिक टप्प्याला सुरुवात झाली आहे. मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे व पुणे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी निविदा प्रक्रिया सोमवारी (ता.27) सुरू केली. पहिल्या बैठकीत काही विकसकांना आमंत्रित करण्यात आले. वाणिज्य व प्रवाशांच्या संख्येच्या आधारावर स्थानकांची निवड करण्यात आली आहे. निविदा प्रक्रियेचे टप्पे सादर करण्यात आले. कुठलेही अतिक्रमण नसलेली जमीन विकसकांना वाणिज्य वापरासाठी भाडेतत्त्वावर देण्यात येणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत स्पष्ट केले.

या स्थानकांच्या पुनर्विकासाच्या निविदा 12 जूनला 2017 मध्ये खुल्या केल्या जाणार असून तोपर्यंत अनेक टप्पे होणार आहेत. बैठकीत विकसकांनी रेल्वेस्थानकाजवळील जमिनीवर असलेला कमी एफएसआय, केंद्र सरकारच्या नियमावली, रेल्वेची मदत, पालिकेच्या परवानग्या, टीडीआर आदीबाबत शंका उपस्थित केल्या. दरम्यान, निविदेतील सर्व अटी पूर्ण करणाऱ्या विकसकाला स्थानकाच्या पुनर्विकासासाठी देकारपत्र देण्यासाठी 15 ते 18 महिन्यांचा कालावधी अपेक्षित असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

पुनर्विकासाचा खर्च
स्थानक खर्च
लोकमान्य टिळक टर्मिनस 250 कोटी
ठाणे 200 कोटी
पुणे 200 कोटी

Web Title: the redevelopment of the station tender