महिला अत्याचारात घट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

रायगड पोलिसांनी महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. त्यात यश येत असल्याचे आकडेवारीवरून दिसते. जिल्ह्यात 28 पोलिस ठाणी आहेत. त्यामध्ये 
गेल्या वर्षी गर्भपात, अनैतिक व्यापार, बालकामगार याबाबतचे 100 गुन्हे दाखल झाले आहेत.

अलिबाग (बातमीदार) : महिलांवरील अत्याचाराच्या घटनांत अनेक जिल्ह्यांत वाढ होत असताना रायगड जिल्ह्यात वेगळे चित्र दिसत आहे. या जिल्ह्यात 2018 मध्ये 346 अशा घटना घडल्या होत्या; तर या वर्षीच्या मे महिन्यापर्यंत ती संख्या 110 आहे. गेल्या वर्षी 130 महिलांच्या विनयभंगाचे गुन्हे दाखल होते. त्यात कमालीची घट झाली असून दोन महिलांचा विनयभंग झाल्याची नोंद पोलिस ठाण्यात आली आहे. 

रायगड पोलिसांनी महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. त्यात यश येत असल्याचे आकडेवारीवरून दिसते. जिल्ह्यात 28 पोलिस ठाणी आहेत. त्यामध्ये 
गेल्या वर्षी गर्भपात, अनैतिक व्यापार, बालकामगार याबाबतचे 100 गुन्हे दाखल झाले आहेत. या वर्षी पहिल्या पाच महिन्यांत 63 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. विनयभंग, अनैतिक व्यापार, खून अशा घटनांतही घट झाली आहे. 

"दामिनी'ची मदत 
महिला अत्याचाराविरोधात वेगवेगळ्या सामाजिक संस्था, संघटनांनी पुढाकार घेऊन काम केले आहे. पोलिसांनी राबविलेले वेगवेगळे उपक्रम यशस्वी ठरले आहेत. त्यामध्ये दामिनी पथकाचा सहभाग महत्त्वाचा आहे. या पथकाने ठिकठिकाणी जाऊन महिलांची छेड काढणाऱ्यांना आणि अत्याचार करणाऱ्यांना वठणीवर आणण्याचा प्रयत्न केला आहे. 

प्रत्येक महिलेनी स्वतःचे संरक्षण स्वतःच करण्याची गरज आहे. अत्याचार रोखण्यासाठी स्वतः पुढाकार घेणे आवश्‍यक आहे. स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे. 
- अनिता तुळपुळे, सामाजिक कार्यकर्त्या 

पोलिस अधीक्षकांच्या पुढाकाराने महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात वेगवेगळ्या प्रकारची कार्यशाळा घेऊन समुपदेशन करण्यात आले. ठिकठिकाणी जनतेमध्ये जनजागृती करण्यात आली. काहींवर कायदेशीर कारवाई करून त्यांना वठणीवर आणण्याचाही प्रयत्न केला 
- संगीता बोचर, पोलिस उपनिरीक्षक, महिला तक्रार निवारण कक्ष 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reduction in female violence