esakal | भाजप प्रवेशाबाबत गणेश नाईक द्विधा मनःस्थितीत
sakal

बोलून बातमी शोधा

गणेश नाईक द्विधा मनःस्थितीत

पक्षांतर करण्यावरून नवी मुंबईसह संपूर्ण राज्यभरात चर्चेचा विषय ठरलेल्या गणेश नाईकांच्या भाजप प्रवेशाचा वेग काहीसा मंदावला आहे. एकाच घरात एकापेक्षा जास्त उमेदवारी अथवा पदे न देण्याच्या संघाच्या नियमामुळे नाईकांची कोंडी झाल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून समजले आहे.

भाजप प्रवेशाबाबत गणेश नाईक द्विधा मनःस्थितीत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : पक्षांतर करण्यावरून नवी मुंबईसह संपूर्ण राज्यभरात चर्चेचा विषय ठरलेल्या गणेश नाईकांच्या भाजप प्रवेशाचा वेग काहीसा मंदावला आहे. एकाच घरात एकापेक्षा जास्त उमेदवारी अथवा पदे न देण्याच्या संघाच्या नियमामुळे नाईकांची कोंडी झाल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून समजले आहे. त्यामुळे सानपाडा येथे पदाधिकाऱ्यांनी आयोजित एका कार्यक्रमात आपण शेताच्या बांधावर उभे असून ना तळ्यात, ना मळ्यात आणि ना खळ्यात या नाईकांनी केलेल्या सूचक वक्तव्यातून बरेच काही स्पष्ट होत आहे.  

राज्यभरात सध्या सुरू असलेल्या भाजप प्रवेशाच्या लाटेवर नाईक पुत्र संदीप नाईक हे काही निवडक नगरसेवक व पदाधिकाऱ्यांसमवेत स्वार झाले खरे. परंतु, एक महिन्याच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अद्यापही नाईक कुटुंबीयांना ठोस आश्‍वासन मिळालेले नाही. त्यामुळे संदीप नाईक यांच्यापाठोपाठ आता गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशाची शक्‍यता मावळत चालली आहे. सानपाडा प्रभागातील काही सामाजिक व राजकीय कार्यकर्ते आणि स्वयंसेवी संस्थांनी एकत्र येऊन शनिवारी (ता.३१) आयोजित केलेल्या सत्कार समारंभात गणेश नाईकांना आमंत्रित केले होते. 

या कार्यक्रमात पहिल्यांदाच नाईकांनी भाजप प्रवेशाच्या चर्चांवर अप्रत्यक्ष बोलून मौन सोडले. राज्यभरात सुरू असलेल्या पक्षांतरावर बोलताना नाईकांनी आपला उल्लेख केला. मी आज ज्या पक्षामध्ये... असे बोलताना अचानक नाईकांनी घुमजाव करीत मी आज कुठल्या पक्षामध्ये आहे हे मलाच माहीत नाही. मी कुठे गेलेलो नाही आणि मला कोणी ठेवलेले नाही. असे वक्तव्य करून भाजप प्रवेशावर साशंक असल्याचे स्पष्ट झाले. आपल्या भाषणात नाईकांनी बोलताना सध्या मी बॉर्डरवर आलो आहे. मी बांधावर आहे, ना तळ्यात, ना मळ्यात ना खळ्यात असे सांगून भाजप प्रवेशाबाबत द्विधा मनःस्थितीत असल्याचे स्पष्ट संकेत कार्यकर्त्यांना दिले. नाईकांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. मात्र, गणेश नाईकांचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त वारंवार पुढे ढकलला जात असल्याने नाईकांसोबत भाजपमध्ये प्रवेशाचे स्वप्न रंगवणाऱ्या पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे. 

पेच मतदारसंघांचा 
माजी आमदार संदीप नाईक यांचा भाजप प्रवेश आणि गणेश नाईक यांच्या संभाव्य प्रवेशामुळे नवी मुंबईतील राजकीय समीकरणे बदलली आहेत. शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा उमेदवारीकरीता जोरदार बांधणी करीत असल्यामुळे भाजपला एक जागा सोडावी लागणार आहे; तर बेलापूरमध्ये भाजपचा स्थानिक आमदार मंदा म्हात्रे असल्यामुळे त्यांचेही पुनर्वसन भाजपला करावे लागणार आहे. या दोन्ही मतदारसंघांचा पेच प्रसंगांचा तिढा सुटत नसल्याने गणेश नाईकांचा प्रवेश लांबणीवर पडण्याची शक्‍यता आहे.

loading image
go to top