मुख्यालय, पोलिस ठाणी होणार भंगारमुक्त !

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 मे 2017

ठाणे - ठाणे शहरातील पोलिस मुख्यालयासह शहरातील पोलिस ठाण्यांभोवतीचे गाड्यांचे भंगार दूर करण्यासाठी ठाणे महापालिकेने डायघर येथील जागा पोलिस प्रशासनाला देऊ केली आहे. या भागात भंगाराची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शुक्रवारी ठाणे पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या भेटीदरम्यान केलेल्या चर्चेत हा निर्णय झाला. शुक्रवारी (ता. 19) "सकाळ'च्या ठाणे टुडेमध्ये "पोलिस मुख्यालयात भंगार' ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर महापालिका आणि पोलिसांनी तातडीने त्यावर तोडगा काढला.

ठाणे - ठाणे शहरातील पोलिस मुख्यालयासह शहरातील पोलिस ठाण्यांभोवतीचे गाड्यांचे भंगार दूर करण्यासाठी ठाणे महापालिकेने डायघर येथील जागा पोलिस प्रशासनाला देऊ केली आहे. या भागात भंगाराची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शुक्रवारी ठाणे पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या भेटीदरम्यान केलेल्या चर्चेत हा निर्णय झाला. शुक्रवारी (ता. 19) "सकाळ'च्या ठाणे टुडेमध्ये "पोलिस मुख्यालयात भंगार' ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर महापालिका आणि पोलिसांनी तातडीने त्यावर तोडगा काढला. यामुळे अस्वच्छतेसह केवळ पोलिस ठाणेच नव्हे, तर शहरातील रस्त्यांच्या बेवारस पार्क केलेल्या वाहनांनाही डायघरमध्ये स्थलांतरित करून तेथे त्यांची विल्हेवाट लावली जाणार आहे. त्यासाठी पालिका प्रशासनाने पोलिसांना तीन क्रेन देण्याचेही ठरले आहे. 

ठाणे शहरातून विविध कारवायांदरम्यान जप्त केलेल्या वाहनांना पोलिस ठाण्याच्या परिसरात वर्षानुवर्ष रचून ठेवण्यात येत असल्याने त्यांचे रूपांतर भंगारात झाले आहे. शहरातील पोलिस ठाण्यांच्या परिसरात अशा भंगाराचा खच पडल्याने पोलिस ठाण्यात काम करणाऱ्या पोलिसांचे आरोग्य धोक्‍यात आले होते. पोलिस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांनाही त्याचा मोठा त्रास होत होता. पोलिस मुख्यालयाची परिस्थितीही त्यापेक्षाही वेगळी नसून पोलिस मुख्यालयाचा परिसरही भंगारच्या विळख्यात सापडल्याची सविस्तर बातमी "सकाळ'मध्ये प्रसिद्ध होताच त्याची त्वरित दखल घेण्यात आली. डायघर येथील मोकळ्या जागेवर अशी भंगार वाहने टाकून त्यांची विल्हेवाट लावण्यात येणार आहे. शहरातील रस्त्यावर कैक दिवस पार्क करून ठेवलेल्या बेवारस वाहनांवरही कारवाई होणार आहे. ही भंगार वाहने तत्काळ हटवण्यात येणार असून, पोलिस प्रशासन आणि महापालिका प्रशासनाने याला सहमती दर्शवली आहे. 

गरज तत्काळ कारवाईची 
ठाण्यातील पोलिस ठाणे आणि मुख्यालय परिसराला भंगार गाड्यांची अवकळा आली असून, ही अस्वच्छता तत्काळ स्वच्छ करण्याची गरज आहे. बेवारस आणि भंगार वाहने पोलिसांनी दूर करण्याची गरज असून, पालिका आयुक्तांनी पोलिसांसाठी डायघर येथील जागा दिली आहे. प्रत्येक पोलिस ठाण्याची स्वच्छता करून ही वाहने डायघरला स्थलांतरित होणार आहेत. नागरिकांना आता थेट कारवाईची अपेक्षा आहे. यावर तत्काळ कारवाईची गरज असल्याची प्रतिक्रिया ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते महेंद्र मोने यांनी दिली. 

Web Title: Regarding the municipal commissioner's police commissioner