वयोमर्यादेच्या आदेशाकडे गृहविभागाचे दुर्लक्ष

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 9 डिसेंबर 2016

मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलिस उपनिरीक्षक पद भरतीच्या देण्यात आलेल्या जाहिरातीत खुल्या वर्गाच्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 28 वर्षे आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी 31 वर्षे ठेवण्यात आली आहे.

मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलिस उपनिरीक्षक पद भरतीच्या देण्यात आलेल्या जाहिरातीत खुल्या वर्गाच्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 28 वर्षे आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी 31 वर्षे ठेवण्यात आली आहे. मात्र, राज्याच्या सामान्य प्रशासन विभागातर्फे 25 एप्रिल 2016 रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या निरनिराळ्या पदांच्या स्पर्धा परीक्षान्वये शासन सेवेतील प्रवेशासाठी खुल्या वर्गासाठी कमाल वयोमर्यादा 38 वर्षे व मागासवर्गीय उमेदवारांसाठी 43 वर्षे करण्यात आली असली, तरी त्याकडे गृह विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसने केला आहे.

कॉंग्रेसचे सचिन सावंत म्हणाले, की महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलिस उपनिरीक्षक पद भरतीची जाहिरात काढण्यात आली आहे. या जाहिरातीनुसार गृह विभागाने सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय धुडकावून लावल्याचे स्पष्ट होत आहे. हा निर्णय शासनाच्या सर्व विभागांना बंधनकारक असून, गृह विभागाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून पदासाठीची वयोमर्यादा स्वतःच ठरवून जाहिरात प्रकाशित केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Web Title: Regardless of age command home department