ऑनलाइन औषधविक्रीसाठी ई-पोर्टलवर नोंदणी बंधनकारक

सुनीता महामुणकर
रविवार, 11 ऑगस्ट 2019

सर्वसाधारण औषधांसह गंभीर आजारांवरील औषधांची सर्रास ऑनलाइन विक्री केली जाते. नियमांचे उल्लंघन करून गर्भपाताशी संबंधित औषधेही विकली जातात, असे निदर्शनास आणणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात करण्यात आली आहे.

मुंबई : ऑनलाइन औषधे खरेदी करताना व्हॉट्‌सऍपवरूनही डॉक्‍टरांचे प्रिस्क्रिप्शन पाठवणे बंधनकारक आहे. ऑनलाइन कंपन्यांनीही केंद्र सरकारच्या ई-पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य आहे, अशी माहिती नुकतीच उच्च न्यायालयात देण्यात आली. 

सर्वसाधारण औषधांसह गंभीर आजारांवरील औषधांची सर्रास ऑनलाइन विक्री केली जाते. नियमांचे उल्लंघन करून गर्भपाताशी संबंधित औषधेही विकली जातात, असे निदर्शनास आणणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. या याचिकेवर नुकतीच मुख्य न्यायाधीश प्रदीप नंद्राजोग आणि न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. कोणतीही तपासणी न करता औषधांची ऑनलाइन विक्री केली जाते. त्यांत 'एच' आणि 'एक्‍स' या गटांतील औषधेही असतात; गंभीर आजारांवरील या औषधांसाठी वैद्यकीय तज्ज्ञांचे प्रिस्क्रिप्शन आणि त्याची तपासणी अनिवार्य असावी, अशी मागणी याचिकादाराने केली होती. 

केंद्र सरकारनेही याचिकादाराच्या मागण्यांची दखल घेतली असून, ई-फार्मसी पोर्टल नियम अद्ययावत करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार सर्व ऑनलाइन कंपन्यांना केंद्र सरकारच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे बंधनकारक असेल. या नियमावलीच्या मसुद्यावर सूचना व हरकती मागवण्यात आल्या आहेत. या नियमावलीचा अंतिम मसुदा 28 ऑगस्टपर्यंत तयार होईल, असे केंद्र सरकारच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले. या नियमांचे पालन करणे सर्व कंपन्यांवर बंधनकारक असेल. याबाबत खंडपीठाने समाधान व्यक्त केले आणि याचिका निकाली काढली. 

प्रिस्क्रिप्शनविना विक्री नाही 
कोणत्याही औषधाची ऑनलाइन विक्री करताना संबंधित ग्राहकाला डॉक्‍टरांचे प्रिस्क्रिप्शन अपलोड करण्यास आणि व्हॉट्‌सऍपवरूनही पाठवण्यास सांगितले जाते. प्रिस्क्रिप्शन मिळाल्याशिवाय औषधांची विक्री केली जात नाही, असे संबंधित कंपन्यांनी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Registration is mandatory on eportal for online pharmacy