तर रिलायन्सची पाईपलाईन उखडून काढू; संतप्त शेतकऱ्यांनी दिला इशारा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

आंदोलनाचे नेतृत्व भाजपचे नेते नंदकुमार पाटील यांनी केले. वाडा तालुक्यातून सन 2007 मध्ये रिलायन्स या कंपनीची गॅस पाईपलाईनला गेली आहे. या लाईनखाली अनेक गावे बाधित झाली असून बिलावली व डोंगस्ते येथील 103 शेतकरी या पाईपलाईनमध्ये बाधित झाले आहेत.

वाडा : रिलायन्स या कंपनीची गॅस पाईपलाईन सन 2007 साली वाडा तालुक्यातून गेली असून या पाईपलाईनजवलील शेतांची अद्यापही दुरूस्ती कंपनीने केली नाही. त्यामुळे त्या जागेत शेतकऱ्यांना उत्पन्न घेता येत नसल्याने त्यांचे नुकसान होत आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी वारंवार कंपनीकडे पाठपुरावा करूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज बिलावली येथे पाईपलाईन उखडण्याचे आंदोलन सुरू केले असता प्रशासनाने त्यात मध्यस्थी करून कंपनीबरोबर बैठक लावण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित केले. 

या आंदोलनाचे नेतृत्व भाजपचे नेते नंदकुमार पाटील यांनी केले. वाडा तालुक्यातून सन 2007 मध्ये रिलायन्स या कंपनीची गॅस पाईपलाईनला गेली आहे. या लाईनखाली अनेक गावे बाधित झाली असून बिलावली व डोंगस्ते येथील 103 शेतकरी या पाईपलाईनमध्ये बाधित झाले आहेत. पाईपलाईनचे काम सुरू असताना त्यांनी शेतामध्ये चर खोदले असून काम पूर्ण झाल्यावरही कंपनीने यातील काही चर बुजवले नाहीत. तर काही ठिकाणी चरातील माती बाहेरील शेतात टाकल्याने मातीचे ढीग तयार झाले आहेत. त्यांचेही सपाटीकरण न करताच तसेच ढीग अकरा वर्षानंतरही तसेच आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सदरच्या ठिकाणी भात व इतर उत्पन्न घेता येत नाही. तसेच शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. रिलायन्स कंपनी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्याकडे दाद मागूनही न्याय मिळत नसल्याने अखेर बिलावली व डोंगस्ते येथील शेतकऱ्यांनी आज हातात कुदळ फावडे घेऊन गॅस पाईपलाईन खोदण्याचे काम सुरू केले. या आंदोलनाची दखल उपविभागीय कार्यालयाचे नायब तहसीलदार सदानंद घुटे यांनी घेऊन ते आंदोलन स्थळी पोहोचले आणि त्यांनी शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा बघितला. त्यानंतर रिलायन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक करण्याचे मान्य केले. त्यानंतर घुटे यांनी आंदोलनकर्त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली असता शेतकऱ्यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले. 

या आंदोलनात जिल्हा परिषद सदस्या सुवर्णा पडवले, बिलावलीच्या सरपंच रंजिता जाधव यांच्यासह अनेक शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. 
येत्या आठ दिवसात याबाबतचा निर्णय रिलायन्स कंपनी ने निकालात न काढल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नंदकुमार पाटील यांनी दिला आहे. 

 

Web Title: Reliances pipeline will be pulled out Angry farmers warned