शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नासाठी धार्मिक संस्थांची मदत 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 मे 2018

धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या पुढाकाराने गरीब शेतकऱ्यांच्या मुलींचे सामुदायिक विवाह सोहळे सुरू असून त्यासाठी मुंबईतून विविध धार्मिक संस्था, दानशूर व्यक्ती आदींनी सुमारे 35 लाख रुपये देणगी रूपाने दिले आहेत.

मुंबई : धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या पुढाकाराने गरीब शेतकऱ्यांच्या मुलींचे सामुदायिक विवाह सोहळे सुरू असून त्यासाठी मुंबईतून विविध धार्मिक संस्था, दानशूर व्यक्ती आदींनी सुमारे 35 लाख रुपये देणगी रूपाने दिले आहेत. राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांच्या पुढाकाराने ही योजना सुरू झाली आहे. 

एकीकडे देवळांच्या बॅंक खात्यात लाखो रुपये तसेच पडून असतात; तर दुसरीकडे पैशांअभावी शेतकऱ्यांच्या मुलींचे विवाह जुळण्यास अडथळे येतात. त्यामुळे या योजनेसाठी देवळांनाही निधी देण्याचे आवाहन करण्यात आले होते. नुकतेच नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या नाम संस्थेनेही या योजनेसाठी 17 लाखांचा निधी दिला होता.

त्याव्यतिरिक्त मुंबईतून 35 लाख रुपये जमा झाले आहेत. मुंबईतून किमान 30 संस्था वा व्यक्तींनी देणगी दिली आहे. तीन दात्यांनी आपले नाव गुप्त ठेवून पैसे दिले आहेत. आज मुंबई आणि रत्नागिरीत हे विवाह सोहळे झाले. या योजनेत विवाह करणाऱ्या दाम्पत्यांना पोषाख, संसारोपयोगी भांडी दिली जातात, त्याखेरीज वधूला तीन ग्रॅमचे मंगळसूत्रही दिले जाते, अशी माहिती धर्मादाय आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिली. 

या संस्थांनी केली मदत 

श्री महिला उद्योग लिज्जत पापड संस्थेने 11 लाख; तर बोरिवलीच्या वजिरा नाका येथील गणेश मंदिराने सव्वापाच लाख रुपये दिले. श्री चंद्रप्रभा दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट व भानजी भीमजी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे प्रत्येकी पाच लाख; तर श्री स्वामी समर्थ मठातर्फे तीन लाख रुपये देण्यात आले. अंबाधाम मंदिर ट्रस्ट, जागृत विनायक मंदिर तसेच सेंट स्टिफन चर्च यांनीही आपापल्या परीने हातभार लावला आहे. 

Web Title: Religious organizations help the marriage of farmers daughters