उल्हासनगरात झळकली डंपिंग हटावची पोस्टर्स; गाड्या रोखण्याचा इशारा

mumbai.jpg
mumbai.jpg

उल्हासनगर : काही दिवसांपूर्वीच उल्हासनगरातील कॅम्प नंबर 5 मधील नागरिकांनी  डंपिंगच्या वासामुळे होणाऱ्या त्रासामुळे पालिकेत येऊन टाहो फोडला होता. लोकशाही दिवशी चक्क तोंडावर मास्क लावून डंपिंगचा विरोध केला. तरीही पालिकेने ठोस उपाययोजना केली नसल्याने ऐन दिवाळीत पेटत्या डंपिंगच्या वासाने त्रस्त  नागरिकांनी डंपिंग हटावची पोस्टर्स लावली आहेत. कायद्याने वागा लोकचळवळच्या पुढाकाराने हे पोस्टर्स लावण्यात आली असून पालिकेने डंपिंगच्या बंद बाबत लवकरात लवकर निर्णय घेतला नाही तर, कचरा गाड्या रोखण्याचा इशारा कायद्याने वागाचे सर्वेसर्वा राज असरोंडकर यांनी दिला आहे.

कॅम्प नंबर 2 मधील म्हारळ गावाजवळील डंपिंग ओव्हरफ्लो झाल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून दोन अडीच वर्षांपूर्वी कॅम्प नंबर 5 मध्ये खदाणीत डंपिंग सुरू करण्यात आलेले आहे. शिवसेनेने सर्वप्रथम हे डंपिंग बंद करण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढला होता. त्यानंतर वज्र, प्रबल संघटना यांच्या वतीने घेण्यात आलेल्या सह्यांच्या मोहिमेतही सर्वपक्षीय सहभागी झाले होते. डंपिंग सातत्याने पेटते राहत असल्याने स्थानिक नागरिकांनी ऐन दिवाळीच्या सणासुदीत नरकयातना भोगली आहे. येथे डंपिंगच्या सभोवताली वसाहती आणि दोन शाळा देखिल असल्याने दररोज डंपिंग मधून येणाऱ्या महाभयंकर उग्र वासामुळे नागरिक, विद्यार्थी यांना श्वाशोश्वास घेणे अवघड झाले आहे.

या वासातून नागरिकांची सुटका व्हावी म्हणून नगरनियोजन समिती सभापती मीना सोंडे, पर्यावरण तज्ञ गुणवंत पाटील यांनी डंपिंगच्या ढिगाऱ्यावर बायोकल्चरल आणि बायोसॅनिटायझर टाकण्याचा पर्याय हाताळला होता. त्याचा यशस्वी प्रयोगही झाला. मात्र त्यानंतर या प्रयोगाची हवी तशी अंमलबजावणी केली जात नसल्याने किंबहूना पालिकेकडून सहकार्य मिळत नसल्यामुळे पुन्हा वासाचे साम्राज्य पसरत असल्याचा आरोप मीना सोंडे यांनी केला आहे.

आता कायद्याने वागा लोकचळवळचे राज असरोंडकर यांनी डंपिंगच्या विरोधात उडी घेतली आहे. त्यांच्या संघटनेच्या परिसरात डंपिंग हटावचे पोस्टर्स झळकवले आहेत. ही पोस्टर्स चर्चेचा विषय बनली आहेत. यासंदर्भात पालिका अधिकारी विकास चव्हाण, विनोद केणे यांच्याशी विचारणा केली असता, डंपिंग ग्राऊंडसाठी पर्यायी भूखंड देण्याची मागणी राज्यशासनाकडे करण्यात आली असून लवकरच त्यावर तोडगा निघणार अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com