लसीकरणापासून अनेक मुले दूर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 मे 2017

कुर्ला, सायन, माटुंगा, अंधेरीत प्रमाण अधिक

कुर्ला, सायन, माटुंगा, अंधेरीत प्रमाण अधिक
मुंबई - लसीकरणाद्वारे अनेक मुलांना काही आजारांपासून दूर ठेवता येते; मात्र याच लसींपासून अनेक मुले दूर राहत असल्याचे चित्र मुंबईतही दिसून येते. सातत्याने होणारे स्थलांतर हे त्यामागील प्रमुख कारण आहे. दुर्गम भाग किंवा अज्ञानामुळे काहींचे लसीकरण होत नाही. कुर्ला, सायन, माटुंगा, मानखुर्द, गोवंडी, अंधेरी (प.), मालाड (प.) येथील मुलांमध्ये लसीकरणाचे प्रमाण कमी आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.

मुंबई महापालिकेची रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून नियमित लसीकरण सुरू असतानाही काही मुले त्यापासून दूर राहत आहेत. मुंबईतून इतर राज्यांत अंतर्गत स्थलांतरामुळे हे प्रमाण वाढत असल्याचे लक्षात आले आहे, अशी माहिती पालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी दिली. 2020 पर्यंत एकही मूल लसीपासून दूर राहू नये, यासाठी चार वर्षांपासून देशभरात "इंद्रधनुष्य मोहीम' सुरू आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर मुंबईत लसीकरणाचा दुसरा टप्प्पा राबवण्यात येणार आहे. यात 8,265 मुलांना लस दिली जाईल.
डॉ. केसकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, वस्त्या, इमारतींचे बांधकाम करणारे, वीटभट्ट्यांवरील कामगार, अतिदुर्गम आणि डोंगराळ भागातील नागरिक, सतत स्थलांतर करणाऱ्या कुटुंबातील मुले लसीपासून दूर राहत आहेत. अशांना मोहिमेत लस दिली जाते. त्यांना लस दिल्याचा पाठपुरावा करणारे कार्ड देण्यात येते.

तिसऱ्या वर्षी मुंबईला लसीकरण मोहिमेतून वगळण्यात आले होते. चौथ्या वर्षी पुन्हा मुंबईचा समावेश झाला आहे. त्यानुसार, एप्रिलमध्ये मोहिमेचा पहिला टप्पा झाला. यात 9620 पैकी 6355 (66 टक्के) मुलांना लस देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात 8,265 मुलांचे उद्दिष्ट आहे. पहिल्या टप्प्यात राहिलेल्या मुलांनाही यात सहभागी करून घेण्यात आल्याची माहिती सहायक आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रशेखर चिपळूणकर यांनी दिली.

स्थानकावरील मुलांनाही लस
इंद्रधनुष्य मोहिमेअंतर्गत रेल्वेस्थानकाच्या फलाटावर राहणाऱ्या मुलांनाही लस दिली जाणार आहे. या मुलांपर्यंत लसीकरण पोहोचावे, यासाठी इंद्रधनुष्य मोहिमेंतर्गत 5 ते 16 मेपर्यंत ही मोहीम सुरू राहील, अशी माहिती डॉ. केसकर यांनी दिली.

Web Title: removing many children from vaccine