दिघा विभाग कार्यालयाचे नूतनीकरण रखडले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

नवी मुंबई महापालिकेच्या दिघ्यातील गणपती बाप्पा तलावानजीक असणाऱ्या जी प्लस एक मजली दिघा विभाग कार्यालयाच्या नूतनीकरणाचे काम एप्रिल महिन्यात सुरू करण्यात आले. मात्र, नूतनीकरण्याच्या कामावेळी ही इमारत पूर्णपणे जीर्ण झाल्याचे निदर्शनास आल्याने हे काम थांबवण्यात आले आहे.

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या दिघ्यातील गणपती बाप्पा तलावानजीक असणाऱ्या जी प्लस एक मजली दिघा विभाग कार्यालयाच्या नूतनीकरणाचे काम एप्रिल महिन्यात सुरू करण्यात आले. मात्र, नूतनीकरण्याच्या कामावेळी ही इमारत पूर्णपणे जीर्ण झाल्याचे निदर्शनास आल्याने हे काम थांबवण्यात आले आहे. नूतनीकरणाचे हे काम सात महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित होते; परंतु आता आठ महिने झाल्यानंतरही इमारतीच्या नूतनीकरणाचे हे काम पूर्णपणे ठप्प आहे. त्यातच आता नव्याने इमारत बांधण्याचे पालिकेच्या विचाराधीन आहे. मात्र, नव्याने इमारती बांधण्याच्या कामाला मुहूर्त कधी मिळणार? असा सवाल दिघावासीयांकडून उपस्थित केला जात आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या दिघा विभाग कार्यालयाची इमारत ही ग्रामपंचायत काळापासून अस्तित्वात होती. ही इमारती धोकादायक झाल्यामुळे नवी मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी जीर्ण झालेल्या दिघा विभाग कार्यालयाचे नूतनीकरण आणि पुनर्बांधणी करण्याच्या अनुषंगाने मान्यता दिली होती. त्यानुसार या प्रभाग कार्यालयाचे ५० लाख रुपये खर्चून नूतनीकरणाचे काम सुरू केले होते. मात्र, नूतनीकरण कामाच्या वेळी इमारत धोकादायक झाल्याचे निर्दशनास आल्यानंतर नव्याने इमारत बांधण्याचे पालिकेने ठरवले आहे. त्यामुळे नूतनीकरणाचे काम रखडले आहे. तोपर्यत दिघा विभाग कार्यालय हे रामनगरमधील ओएस वन भूखंडावर ठाणे-बेलापूर मार्गावरील दिघा परिसरातील बांधित झालेल्या गाळेधारकांसाठी बांधण्यात आले होते. त्या ठिकाणी बांधित झालेल्या गाळेधारकांनी ताबा न घेतल्यामुळे रिकाम्या असणाऱ्या गाळ्यांमधून दिघा विभाग कार्यालयाचे कामकाज करण्यात येत आहे.

दिघा विभाग कार्यालयाच्या नूतनीकरणाचे काम थांबवण्यात आले असून, नव्याने इमारत उभी करण्याचे पालिकेने ठरवले आहे. लवकरात लवकर दिघा विभाग कार्यालयाची नव्याने इमारत बांधण्यात येणार आहे.
- संजय देसाई, कार्यकारी अभियंता, नवी मुंबई महापालिका.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Renewal of Digha section office stop