महिलांच्या उन्नतीसाठी झटणाऱ्या सावित्रीच्या लेकी

Latika-and-Sonal
Latika-and-Sonal

महिलांच्या सुरक्षेबाबतचा नेमका अजेंडा कोणताच पक्ष जाहीरपणे सांगताना दिसत नाही. मुंबईसारख्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असताना सरकार ढिम्म आहे. अशा स्थितीतही शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडणाऱ्या युवतींसह महिलांनाही प्रवाहात आणण्यासाठी एक माऊली झटते आहे. त्यासोबतच महिलांची आर्थिक उन्नती व्हावी, यासाठीही दुसरी माऊली झटते आहे. महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी डॉ. सौ. लतिका भानुशाली, तर महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी सौ. सोनल वसईकर मुंबईत चौफेर लढा देत आहेत. अफाट मुंबईत अनेक कष्ट, यातना व त्रास सहन करीत दोन्ही सावित्रीच्या लेकी शेकडो महिलांचा आधार बनल्या आहेत. डॉ. भानुशाली यांनी आदिवासींपासून उच्चभ्रू कुटुंबांतील महिलांना शिक्षणाची कवाडे खुली करून दिली आहेत. बचत गटाच्या माध्यमातून मुंबईसारख्या ठिकाणी वसईकर यांनी महिलांची आर्थिक उन्नती साधली आहे. पंधरा हजारपेक्षाही जास्त महिलांच्या त्या समन्वयक आहेत. किमान तीनशे कुटुंबे वसईकर यांच्यामुळे स्थिरावली आहेत.

महिलांची सुरक्षितता व त्यांचे सबलीकरण अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. शासनाच्या पातळीवर त्याचा आराखडा आखला जातोही आहे. मात्र, तरीही ‘निर्भया’सारखे प्रकार होत आहेत. केवळ घोषणाबाजी केली जात आहे. अशा स्थितीत महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी घाटकोपर येथील डॉ. लतिका भानुशाली यांनी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. त्या रामनिरंजन झुनझुनवाला महाविद्यालयात मराठी विभागात सेवेत आहेत. कॉलेजनंतर आंतरजातीय विवाह त्यांनी केला. त्यानंतर त्यांनी अडचणींचा डोंगर पार करीत मराठी विषयातील डॉक्‍टरेट मिळविली. ‘चूल व मूल’ या जोखडातून त्या बाहेर पडल्या. त्यांनी झुनझुनवाला कॉलेजमध्ये नोकरी सुरू केली.

मराठीकडे विद्यार्थ्यांचा कल कमी होतोय, ही स्थिती सातत्याने त्यांना सतावत होती. त्यामुळे डॉ. लतिका यांनी मुलींच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित केले. त्यासाठी मुंबईतील पंधरापेक्षा जास्त उपनगरांत फिरल्या. मुलींना, त्यांच्या कुटुंबीयांना महत्त्व पटवून दिले. त्यांनी आदिवासी मुलींच्या शाळेत सेवातत्त्वावर मोफत शिकविण्यास सुरवात केली. हळूहळू कामाने मोठे रूप धारण केले. त्यांच्या कामाला त्यांच्या कॉलेजमधूनही प्रोत्साहन मिळाले. शेकडो मुलींना त्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे. त्यामुळे महिला, युवतींच्या त्या आयडॉल ठरल्या आहेत.

दुसरी सावित्रीची लेक सोनल वसईकर यांचेही काम महिलांना आर्थिक सक्षम करणारे आहे. सोनल यांच्याकडे मुंबईतील सर्व बचत गटांच्या समन्वयाची जबाबदारी आहे. त्यांनी ‘एमएसडब्ल्यू’ शिक्षण पूर्ण केले आहे. सोनल यांनी त्यांच्या घरापासून सुरू केलेली बचतीची मोहीम आज चळवळ म्हणून उभी राहिली आहे. सुमारे तीनशे कुटुंबांच्या आर्थिक नियोजनाची घडी सोनल यांच्यामुळे बसली आहे. सुमारे दीड हजारांपेक्षा जास्त बचत गटाच्या त्या समन्वयिका म्हणून काम करीत आहेत. त्यामुळे पंधरा हजारांहून अधिक महिलांच्या त्या आर्थिक सल्लागार बनल्या आहेत. परळ, वाशी, मानखुर्द, भायखळा, मालाड, कांदिवली, बोरिवली, घाटकोपर, वरळी आदी ठिकाणच्या महिलांना त्यांनी एकत्र आणले. त्यातून महिला बचत गटात सक्षमता आली. दलाली बंद करून महिला बचत गटांना थेट मार्केट मिळवून देण्यात त्यांना यश आले.

महिलांच्या शैक्षणिक आणि आर्थिक सक्षमतेला शासनाने प्रधान्य दिले पाहिजे. महिला सक्षम झाल्या, शिकल्या; तरच प्रगती शक्‍य आहे. त्यासाठी शासनाने धोरण आखले पाहिजे. मात्र, तसे धोरण आखले जात नाही. हे दुर्दैव आहे.
- डॉ. लतिका भानुशाली

महिलांना बचत गटाद्वारे आर्थिक सक्षम होण्यास वाव आहे. त्यांच्यासाठीच्या योजनांच्या घोषणा होतात. मात्र, त्याच्या अंमलबजावणीवेळी अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. ही स्थिती बदलण्याची गरज आहे.
- सोनल वसईकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com