रिपब्लिक टीव्ही चॅनेलच्या ३ पत्रकारांना रायगडमध्ये अटक, मुख्यमंत्र्यांच्या फार्महाऊसमध्ये शिरण्याचा प्रयत्न 

मनोज कळमकर | Wednesday, 9 September 2020

रिपब्लिक टीव्ही चॅनेलच्या तीन पत्रकारांना रायगडमध्ये अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या फार्महाऊसमध्ये शिरण्याच्या प्रयत्न केल्याचा आरोप या पत्रकारांवर करण्यात आला आहे. या पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांच्या फार्महाऊसमध्ये जबरदस्ती घुसून सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ करत धमकी दिली.

मुंबईः रिपब्लिक टीव्ही चॅनेलच्या तीन पत्रकारांना रायगडमध्ये अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या फार्महाऊसमध्ये शिरण्याच्या प्रयत्न केल्याचा आरोप या पत्रकारांवर करण्यात आला आहे. या पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांच्या फार्महाऊसमध्ये जबरदस्ती घुसून सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ करत धमकी दिली. तसंच सुरक्षा रक्षकांना मारहाण देखील केली आहे. त्यानंतर या तिघांना खालापूर पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. 

भिलवले गावाच्या हद्दीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं फार्महाऊस आहे. मंगळवारी संध्याकाळी साडे सात वाजेच्या सुमारास ठाकरे यांच्या फार्महाऊसवर सुरक्षा रक्षक असणारे ङ्यूटीसाठी पायी चालत निघाले होते. त्याच दरम्यान भिलवले धरणावरील पुलावर कारमधून आलेल्या तीन पत्रकारांनी ठाकरे फार्महाऊस कुठे आहे असे विचारले. सुरक्षा रक्षकाला तिघांचा संशय आल्यानं त्यांनी माहित नाही असे उत्तर देत निघून गेले. त्यानंतर तिन्ही पत्रकार फार्महाऊस शोधत प्रवेशव्दाराजवळ पोहोचले. तिघांनी जबरदस्तीनं आतमध्ये प्रवेश करून गार्ड रूममध्ये बसलेल्या सुरक्षारक्षकाला  हाच ठाकरे फार्म हाऊस आहे हे तुला माहीत असताना देखील तुम्ही आम्हाला माहित नाही असे खोटे का सांगितलं, अशी विचारण केली. त्यानंतर या पत्रकारांनी सुरक्षारक्षकाला अश्लील शिवीगाळ आणि धक्काबुक्की करून तेथून निघून गेले. 

या घटनेची माहिती खालापूर पोलिस निरिक्षक विश्वजीत काईंगडे यांना मिळताच त्यांनी तातडीनं मुख्यमंत्र्यांच्या फार्महाऊसवर पथक रवाना केलं. सुरक्षा रक्षकानी सांगितलेल्या वर्णनावरून कार आणि  यातील तीन संशयित इसमांचा तात्काळ शोध घेण्यात आला आणि  त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेतल्यानंतर हे संशयित रिपब्लिक टीव्ही चॅनेलचे पत्रकार असल्याची माहिती समोर आली.

------------

(संपादनः पूजा विचारे) 

Republic TV channel 3 journalists arrested Raigad