
डोंबिवली पूर्वेतील नेकणीपाडा परिसरातील एका गॅरेजमध्ये साप आढळून आल्याची माहिती पॉजचे संस्थापक निलेश भणगे यांना मिळाली
Dombivli News : डुरक्या घोणसची सुटका
डोंबिवली : सर्वात महागडा साप म्हणून ओळख असणाऱ्या आणि छुप्या मार्गाने मोठ्या प्रमाणात तस्करी होणारा डुरक्या घोणस डोंबिवली ग्रामीण भागात आढळून आढळून आला आहे. नेकणीपाडा येथील एका गॅरेजमध्ये हा साप असल्याची माहिती पॉजचे संस्थापक निलेश भणगे यांना मिळाली. त्यांनी घटनास्थळी जाऊन त्याला जीवनदान दिले.
डोंबिवली पूर्वेतील नेकणीपाडा परिसरातील एका गॅरेजमध्ये साप आढळून आल्याची माहिती पॉजचे संस्थापक निलेश भणगे यांना मिळाली. सकाळी 10 च्या दरम्यान गॅरेज उघडल्यानंतर गॅरेजमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी प्राणी मित्र भणगे यांना याची माहिती दिली.
भणगे यांनी घटनास्थळी जाऊन तेथून डुरक्या घोणसची सुटका करत त्याला ताब्यात घेतले. डुरक्या घोणस हा साधारण एक महिन्याचे पिल्लू आहे. त्याने भक्ष्य खाल्लेले असल्याने तो शांत त्या ठिकाणी पडून होता. त्याला पुन्हा मल्लंगगड पट्ट्यातील अधिवासात सोडून देण्यात येणार असल्याचे देखील भणगे यांनी सांगितले.
डुरक्या घोणस हा साधारण 1 फूट ते 8 इंच लांब असतो तर जास्तीत जास्त 3 फूट 3 इंच पर्यंत त्याची लांबी वाढू शकते. त्याचा रंग मातकट किंवा तपकिरी, शरारीवर गडद तपकिरी धब्बे, शरीर दंडगोलाकार, खरखरीत असते. पाल, बेडूक, सरडे, सापसुरळी, उंदीर असे भक्ष्य त्यांचे खाद्य असतात या भक्ष्यांच्या शोधात ते अडचणीच्या ठिकाणी येत असतात.
लहान असताना ते घोणस किंवा अजगरासारखे दिसतात. त्यामुळे अजगराचे पिल्लू असल्यासारखे हे वाटतात. रेताड जमीन, माळरान, जंगल, नागरी वस्ती, दगडांच्या सापडीत, जमिनीखाली त्यांचे वास्तव्य आढळून येते. ईशान्य भारत वगळता सर्वत्र हा डुरक्या घोणस आढळून येतो अशी माहिती प्राणी मित्रांनी दिली.
डुरक्या घोणस हा साप घरात आल्याने मोठ्या प्रमाणात धनलाभ होतो अशी अंधश्रद्धा असल्याने याची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते. सर्वात महागडा साप म्हणून त्याला ओळखले जाते.