निवासी डॉक्‍टरांचा "मास बंक'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मार्च 2017

राज्यभरात रुग्णांचे हाल; नायर रुग्णालयात आपत्कालीन सेवा
मुंबई - लोकमान्य टिळक रुग्णालयात निवासी डॉक्‍टरला झालेल्या मारहाणीनंतर सोमवारी मुंबईसह सर्व राज्यांतील महापालिका आणि सरकारी रुग्णालयांतील निवासी डॉक्‍टरांनी "मास बंक' पुकारला.

राज्यभरात रुग्णांचे हाल; नायर रुग्णालयात आपत्कालीन सेवा
मुंबई - लोकमान्य टिळक रुग्णालयात निवासी डॉक्‍टरला झालेल्या मारहाणीनंतर सोमवारी मुंबईसह सर्व राज्यांतील महापालिका आणि सरकारी रुग्णालयांतील निवासी डॉक्‍टरांनी "मास बंक' पुकारला.

राज्यभरात लाखो रुग्णांना उपचार न मिळाल्याने त्यांचे खूप हाल झाले.
न्यायालयाचा मनाई आदेश असल्याने "मार्ड'ने अधिकृतपणे संप पुकारला नाही. तरीही निवासी डॉक्‍टरांनी "काम बंद' केल्यामुळे राज्यभरात लाखो रुग्णांना उपचारांविना रुग्णालयाच्या आवारात रात्र काढावी लागली. काही जणांनी खासगी रुग्णालयांत उपचार घेतले.

मुंबईतील जे.जे., के.ई.एम., टिळक, नायर या मोठ्या रुग्णालयांसह जी.टी., सेंट जॉर्ज, कामा आणि उपनगरांतील रुग्णालयांतील डॉक्‍टर या आंदोलनात सहभागी झाले. मुंबईसह पुणे, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद आदी मोठ्या शहरांतही अशीच अवस्था होती. नायर रुग्णालयात आपत्कालीन व्यवस्था करण्यात आली होती. के.ई.एम. रुग्णालयात बाह्यरुग्ण विभाग पूर्णपणे बंद होता. के.ई.एम., शीव, जे.जे. आणि सेंट जॉर्ज रुग्णालयात 266 शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या. त्यापैकी जी.टी. रुग्णालयात 16 शस्त्रक्रिया झाल्या. त्यातील 12 मोठ्या शस्त्रक्रिया होत्या. यातील 10 जनरल सर्जरी, तर चार प्लास्टिक सर्जरी होत्या, अशी माहिती रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. मुकुंद तायडे यांनी दिली. नायर रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. रमेश भारमल यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात बाह्यरुग्ण विभाग पूर्णतः बंद ठेवण्यात आला होता. आपत्कालीन विभागात रुग्ण तपासणी सुरू होती. रुग्णालयातील सुमारे 75 निवासी डॉक्‍टरांनी कामावर येणार नसल्याचे लेखी दिल्याचे डॉ. भारमल यांनी सांगितले. के.ई.एम. रुग्णालयात सकाळी 7.30 वाजल्यासून बाह्यरुग्ण विभागात केसपेपर देण्याचे काम बंद झाल्यामुळे शेकडो रुग्णांचे हाल झाले.

'मास बंक' असतानाही रुग्णांवर झाले उपचार
के.ई.एम.  39 मोठ्या, 59 लहान शस्त्रक्रिया, 3 प्रसूती
बाह्यरुग्ण विभागातील नवीन रुग्ण- 427
बाह्यरुग्ण विभागात जुने रुग्ण तपासणी- 1048
अपघातांतील रुग्ण- 175
रुग्णालयात दाखल- 67
मृत्यू- 1

जी.टी. - शस्त्रक्रिया- 16
मोठ्या शस्त्रक्रिया- 8
प्लास्टिक सर्जरी- 4
लहान शस्त्रक्रिया- 4

उपनगरांतील रुग्णालये
ओपीडी- 17, 968 रुग्णांना तपासले
अपघातांतील रुग्ण- 287
दाखल- 433
शस्त्रक्रिया- 70
प्रसूती- 55

निवासी डॉक्‍टरांची उपस्थिती
रुग्णालय एकूण निवासी डॉक्‍टर उपस्थित अनुपस्थित
के.ई.एम 746 133 508 (105 परीक्षेसाठीसुट्टीवर)
सेंट जॉर्ज 30 0 30
जी.टी. 25 13 22

पुढे ढकललेल्या शस्त्रक्रिया
के.ई.एम. - 126
शीव रुग्णालय - 102
जे.जे. - 22
सेंट जॉर्ज - 16

राजकीय दबाव
"मास बंक' मागे घेण्यासाठी निवासी डॉक्‍टरांच्या प्रतिनिधींवर मुंबई महापालिकेतील प्रमुख नेते आणि मंत्रालयातील आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागातून दबाव टाकण्यात आल्याचे निवासी डॉक्‍टरांच्या प्रतिनिधींनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

वैद्यकीय सेवा ठप्प करण्याचा इशारा
डॉक्‍टरांना झालेल्या मारहाणीबाबत कोणतेही ठोस पाऊल न उचलता "मास बंक'मध्ये सहभागी झालेल्या डॉक्‍टरांवर कारवाई करण्याची धमकी देणे हे संतापजनक आहे. तसे झाल्यास राज्यातील वैद्यकीय सेवा ठप्प करण्याचा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने देण्यात आला.

महापौरांबरोबर चर्चा, मात्र ठोस हाती नाही
मुंबईचे महापौर विश्‍वनाथ महाडेश्वर यांची इंडियन मेडिकल असोसिएशन, मार्डचे काही सहकारी यांनी भेट घेतली. यावेळी चर्चा झाली, मात्र कोणतेही ठोस आश्‍वासन देण्यात आले नाही. सरकारी रुग्णालयात पास व्यवस्था सुरू झाल्यास काम करणाऱ्या डॉक्‍टरांना सुरक्षित वाटेल, ही प्रमुख मागणी या घडीला महापौरांसमोर ठेवण्यात आली आहे. त्यावर लवकर काम करण्याचे केवळ आश्‍वासन मिळाले आहे.
- डॉ. सागर मुंदडा, युथ प्रेसिडेंट, इंडियन मेडिकल असोसिएशन.

सायन रुग्णालयात तणावाचे वातावरण
वडाळा - राज्यभरातील निवासी डॉक्‍टरांवर वारंवार होणाऱ्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी मुंबईतील शासकीय आणि महापालिका रुग्णालयातील 4500 निवासी डॉक्‍टरांनी सामूहिक आंदोलन पुकारले होते. डॉक्‍टरांच्या सुरक्षेसाठी पालिका प्रशासनाकडून ठोस उपाययोजना आखण्यात याव्यात व त्याची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी, अशी आंदोलकांची मागणी होती. रविवारी रात्री 8 वाजल्यापासून निवासी डॉक्‍टरांच्या आंदोलनाला सुरुवात झाली. सायन रुग्णालयाची ओपीडी रात्रीच्या वेळेत बंद असल्याने या आंदोलनाचा फारसा प्रभाव जाणवला नाही. मात्र सोमवारी सकाळी पोलिसांच्या, तसेच सुरक्षा रक्षकांच्या कडेकोट बंदोबस्तात प्रवेशद्वार बंद झाल्याने डॉक्‍टरांच्या आंदोलनाबाबत अनभिज्ञ असलेल्या रुग्णांची चांगलीच कोंडी झाली. रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ एकच गर्दी उसळल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते; परंतु डॉक्‍टरांच्या "काम बंद' आंदोलनामुळे त्रस्त झालेल्या रुग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी या अनपेक्षित बंदचे समर्थन करण्याऐवजी डॉक्‍टरांवर शेकडो रुग्णांना वेठीस धरल्याचा आरोप ठेवत संताप व्यक्त केला. डॉक्‍टरांच्या "काम बंद' आंदोलनाबाबत अनेक रुग्ण संताप व्यक्त करीत होते. डॉक्‍टरांवरील हल्ल्याबाबत तीन आरोपींना अटक झाली. त्यांना न्यायालयाने जामीन दिला, ते सुटले. न्यायालयाच्या आदेशापेक्षा डॉक्‍टर मोठे आहेत काय ? रुग्णांना वेठीस धरणे हा गुन्हा नाही का ? असा सवाल त्यांनी केला.

यावेळी अतिदक्षता विभाग, ट्रामा सेन्टर, दवाखान्यात दाखल असलेल्या रुग्णांची सेवा वगळता सर्व सेवा ठप्प करण्यात आल्याने मुंबई व बाहेरून आलेल्या शेकडो रुग्णांचे हाल झाले. याबाबत सायन रुग्णालयाचे डॉक्‍टर आर्शिद टोले यांच्याशी चर्चा केली असता मुंबईतल्या सर्वात मोठ्या सायन रुग्णालयात सुरक्षा रक्षकांची संख्या नगण्य आहे. त्यामुळे डॉक्‍टरांवर हल्ला करण्याच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे, असे सांगितले. धुळे, नाशिक येथील निवासी डॉक्‍टरांवरील हल्ल्याची घटना ताजी असताना शनिवारी वॉर्ड क्र. 20 मध्ये एक महिला पेशंट दगावल्याने मृताच्या नातेवाईकांनी डॉक्‍टर रोहितकुमार जैन यांच्यावर हल्ला केला. हल्ल्याचे स्वरूप कोणतेही असो, या हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो, असेही ते म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: residential doctor strike