रहिवाशांनी उभारला ‘शून्य ओला कचरा’ प्रकल्प

रहिवाशांनी उभारला ‘शून्य ओला कचरा’ प्रकल्प
रहिवाशांनी उभारला ‘शून्य ओला कचरा’ प्रकल्प

नवी मुंबई ः घरातील कचरा बाहेर काढला की आपले कर्तव्य संपले, अशी बहुतेकांची भावना असते. परंतु प्रशासनाला दोष न देता आपण तयार केलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची काळजी अनेक पर्यावरणप्रेमी नागरिक घेत असतात. त्यातूनच नेरूळ येथील शिरवणे गावातील हरिश्‍चंद्र सदन गृहसंकुलातील रहिवाशांनी कचरा विल्हेवाटीचा नवीन आदर्श निर्माण केला आहे.

परिसरातील नागरिकांकडून कचऱ्याच्या व दुर्गंधीच्या तक्रारी येऊ लागल्यानंतर व कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी जागा न मिळाल्याने ४० सदनिका असलेल्या या छोट्या सोसायटीतील रहिवाशांनी आपल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा निश्‍चय केला. त्यातूनच ‘शून्य ओला कचरा’ ही आदर्श संकल्पना पुढे आली. सोसायटीतील अनिता पाटील व उमाकांत पाटील या पर्यावरणप्रेमी दाम्पत्याने या प्रकल्पासाठी पुढाकार घेतला. 

टाकीच्या स्वरूपातील घनकचरा विल्हेवाट प्रकल्प सोसायटीच्या छतावर उभारण्यात आला. या प्रकल्पासाठी ५० किलो क्षमतेच्या विशिष्ट रचना असलेल्या दोन टाक्‍या बसवण्यात आल्या. सोसायटीतून दिवसाला १५ ते १६ किलो ओला कचरा तयार होतो. हा ओला कचरा दररोज टाकीत टाकून त्यामध्ये पालापाचोळा व पावसाळ्यात फर्निचरचा भुसा मिसळून दिवसभरात २ ते ३ वेळा ढवळण्यात येतो. त्यामधून खाली पडणाऱ्या पाण्यात साधे पाणी मिसळून झाडांना घालण्यात येते. आठवड्याला १ टाकी भरत असून, २ आठवड्यानंतर खत तयार होते. ज्याचा उपयोग परिसरातील झाडांसाठी करण्यात येत असून, भविष्यात सोसायटीच्या परिसरातील बाग फुलविण्याचा रहिवाशांचा हेतू आहे. 

या प्रकल्पामुळे कचऱ्याची बिलकुल दुर्गंधी येत नाही व आपल्याच कचऱ्याची आपण विधायक पद्धतीने विल्हेवाट लावल्याचे समाधान मिळते. त्यामुळे शून्य ओला कचरा प्रकल्पानंतर आता शून्य सुका कचरा प्रकल्प सुरू करणार आहोत.
- अनिता पाटील, रहिवासी. 

पालिकेच्या वतीने सूचित ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प राबविणे करण्यात आल्याने हा प्रकल्प साकारला. सोसायटीमधील रहिवाशांच्या एकीमुळे हे शक्‍य झाले. 
- उमाकांत पाटील, रहिवासी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com