संकराचा भूखंड देण्यास विरोध 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी विरोध केल्याने हा प्रस्ताव तहकूब

ठाणे : जगप्रसिद्ध "संकरा' नेत्र रुग्णालयाला नाममात्र दरात भूखंड देण्याचा निर्णय महापापालिकेने घेतला होता; पण पालिकेने घातलेल्या अटी मंजूर नसल्याने संकराने हा भूखंड नाकारल्यानंतर प्रशासनाने हा भूखंड दुसऱ्या संस्थेला देण्याचा प्रस्ताव तयार केला होता; पण या प्रस्तावाला मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी विरोध केल्याने हा प्रस्ताव तहकूब करण्यात आला. 

"संकरा नेत्रालय मेडिकल रिसर्च फाऊंडेशन' या चेन्नईस्थित संकरा नेत्रालयाचे काम गोरगरिबांसाठी असल्याने त्यांना ठाण्यातील भूखंड नाममात्र दराने देण्याबाबतचा प्रस्ताव ठाणे महापालिकेने राज्य सरकारला पाठविला होता. अपवादात्मक परिस्थितीत ही मागणी मान्य करत "क्‍लॅरिअंट' कंपनीच्या भूखंडावरील 11 हजार 643 चौरस मीटरचा भूखंड 30 वर्षांसाठी एक रुपया वार्षिक भुईभाड्याने देण्याला मंजुरी देण्यात आली होती; मात्र 30 वर्षांनंतर भाडेपट्ट्याचे नूतनीकरण झाले नाही, तर रुग्णालयासाठी उभारलेल्या इमारतीचा ताबा सर्व अचल मालमत्तेसह पालिकेकडे विनामोबदला वर्ग करावा लागेल, अशी अट सरकारने त्यात घातली.

ही अट व्यवहार्य नसल्याच्या मुद्द्यावर संकराने माघार घेतली होती. त्यानंतर पालिका प्रशासनाने त्याच निर्णयाचा आधार घेत आणि त्याच अटी शर्तीवर हा भूखंड पूर्व द्रुतगती महामार्गावर असलेल्या एका व्यावसायिक रुग्णसेवा देणाऱ्या रुग्णालय व्यवस्थापनाला देण्याचा निर्णय घेतला होता. 

याबाबतचा प्रस्ताव मंगळवारी झालेल्या सभेत चर्चेसाठी आला. या संदर्भात स्वारस्य देकार मागविण्यात का आले नाही, असा प्रश्न भाजपचे नगरसेवक सुनेश जोशी, मृणाल पेंडसे यांनी उपस्थित केला. तसेच भूखंड द्यायचाच होता, तर त्यासाठी जाहिरात का काढण्यात आली नाही, असा प्रश्न राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला यांनी उपस्थित केला. विरोधकांनी आपला विरोध कायम ठेवला होता.

अशा वेळी कायदेशीर बाबी तपासून हा प्रस्ताव मंजूर करण्याची भूमिका सभागृहनेते नरेश म्हस्के यांनी सुरुवातीला मांडली होती. त्यांच्या या भूमिकेवरून भाजप आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी एकाच वेळी संताप व्यक्त केला. अखेर या विषयावर प्रशासनाकडून पुरेसे समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने हा विषय तहकूब करण्याचा निर्णय घेण्यात आला. 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Resistance to give sankras plot