कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रश्‍न मार्गी लावा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जानेवारी 2017

ठाणे  - ठाणे परिवहनमध्ये 22 वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या 613 कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यासाठी पुन्हा लढा सुरू करण्याचा इशारा देणारी बातमी दैनिक "सकाळ'मध्ये "टीएमटीतील कंत्राटी कामगारांचा लढा' या मथळ्याखाली मंगळवारी (ता. 3) प्रसिद्ध झाली. त्याचे पडसाद मंगळवारी परिवहन समितीच्या बैठकीत उमटले. सभापती दशरथ यादव यांनी या कामगारांचा प्रश्‍न निकाली काढण्याचे आदेश प्रशासनाला दिले. 

ठाणे पालिकेच्या परिवहन सेवेतील काही कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचा विषय पटलावर आला असता त्या वेळी समिती सदस्य अनिल भोर यांनी कंत्राटी कामगारांचा प्रश्‍न विचारला. एकीकडे कर्मचाऱ्याची सेवा संपुष्टात येत असताना त्याला कामावर घेऊन त्याला सर्व प्रकारचे फायदे दिले जातात, तर दुसरीकडे 1994 पासून काम करूनही सेवेत कायम केले जात नाही, हा कुठला न्याय, असा सवालही त्यांनी केला. 

प्रकाश पायरे आणि राजेंद्र महाडीक यांनीही यावरून प्रशासनाला घेरले. अखेर सभापती यादव यांनी या कर्मचाऱ्यांचा प्रश्‍न तातडीने निकाली काढण्याचे आदेश दिले. त्यानुसार यासंदर्भात आयुक्तांबरोबर चर्चा केली जाणार आहे. 

दिवा-मुंब्य्रातही टीएमटी सुरू करा 
कर्मचाऱ्यांचा थकलेला दीड कोटींचा महागाई भत्ता आचारसंहितेपूर्वी देण्याची मागणी सदस्यांनी केली, तर शहराची लोकसंख्या वाढत आहे. दिवा-मुंब्रा भागात प्रवासी संख्या जास्त असतानाही टीएमटीची सेवा अपुरी आहे. तेव्हा टीएमटीच्या नव्या बसेस दिवा, मुंब्रा येथे टीएमटीचे टर्मिनल उभारून या मार्गावर बस सेवा सुरू करण्याची मागणी सदस्यांनी केली. 

ई-तिकीट प्रणालीला ब्रेक 
टीएमटीमध्ये ई-तिकीट प्रणाली सुरू करण्यासाठी गेली सात वर्षे प्रयत्न सुरू आहेत; मात्र वारंवार या प्रस्तावाला ब्रेक लागत असल्याबद्दल राजेश मोरे यांनी प्रश्‍न उपस्थित केला. त्यावर यासंदर्भात निविदा मागवल्या; मात्र त्याला प्रतिसादच मिळत नसल्याचे स्पष्टीकरण टीएमटी व्यवस्थापक सुधीर राऊत यांनी दिले. प्रतिसाद मिळत नसल्याने या निविदेला पुन्हा मुदतवाढ दिली आहे.

Web Title: resolve the question of contract employees