कामोठे वसाहतीचा बंद केलेला मार्ग पुन्हा सुरू करा; मनसेची मागणी

दीपक घरत
शुक्रवार, 22 जून 2018

'सकाळ'च्या बातमीची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बंद केलेला मार्ग पुन्हा सुरु करून देण्याची मागणी जवाहर औद्योगिक वसाहतीच्या कार्यालयाला निवेदनाद्वारे केली आहे.

पनवेल - कामोठे वसाहतीतून कळंबोली सर्कल कडे जाणारा मार्ग दगडी भिंत उभारून बंद करण्यात आल्याची बातमी 'सकाळ'च्या शुक्रवारच्या (ता. 22)  अंकात छापून आली होती. 'सकाळ'च्या बातमीची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बंद केलेला मार्ग पुन्हा सुरु करून देण्याची मागणी जवाहर औद्योगिक वसाहतीच्या कार्यालयाला निवेदनाद्वारे केली आहे.

सायं-पनवेल महामार्गाचे काम गेल्या काही वर्षपासून रखडले असल्याने कामोठे वसाहतीतून कळंबोली सर्कल कडे जाण्याकरता कामोठेतील रहिवाशी जवाहर औद्योगिक वसाहतीतून जाणाऱ्या मार्गाचा वापर गेल्या अनेक वर्ष पासून करत होते. कळंबोली, कामोठे परिसरातील एकमेव सीएनजी पंपही याच मार्गावर असल्याने कामोठेतील शेकडो रिक्षा चालकांकडून या रस्त्याचा वापर केला जात होता. मात्र पावसाळ्यात या मार्गावर पडलेल्या मोठ्या खड्यांमुळे कमी झालेल्या रहदारीचा फायदा उचलत औद्योगिक वसाहती तर्फे दगडी भिंत उभारत हा मार्ग बंद करण्यात आला आहे.

रस्ता असलेली जागा औद्योगिक वसाहतीच्या मालकीची असल्याचे वसाहत कार्यालयच म्हणणं आहे. भिंत बांधल्याने नागरिकांची झालेली कोंडी पाहता कामोठे मनसे कार्यकर्त्यांनी शुक्रवारी औद्योगिक वसाहतीच्या कार्यालय गाठत बंद केलेला मार्ग पुन्हा सुरु करून देण्याची मागणी केली असून, मागणी पूर्ण न झाल्यास मनसे कार्यकर्ते स्वतः भिंत हटवतील असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी मनसे कामोठे शहर अध्यक्ष रोहित दुधवडकर, उपशहर अध्यक्ष मनोज कोठारी, विशाल चौधरी आणि विक्रम घोरपडे उपस्थित होते. औद्योगिक वसाहतीच्या कार्यालयाने मनसेचं निवेदन स्वीकारलं असून निवेदनावर योग्य निर्णय घेण्यात येईल असं आश्वासन देण्यात आलं आहे.
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Restart the closed street of Kamoth Colony demand of MNS