प्रबोधनकार ठाकरे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सर्वोत्कृष्ट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2016

मुंबई - उत्सुकता, आनंद आणि त्यानंतर झालेला जल्लोष... असे चैतन्यपूर्ण वातावरण "सकाळ' व सुवर्णस्पर्शच्या "सुखकर्ता गणेशदर्शन' स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात अनुभवायला मिळाले. परळ येथील दामोदर नाट्य मंदिरात बुधवारी (ता. 26) स्पर्धेचा दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळा झाला. शिवडी मध्य विभाग प्रबोधनकार ठाकरे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत सर्वोत्तम ठरले. त्यांना 21 हजार रुपये रोख व मानचिन्ह प्रदान करून गौरवण्यात आले. "सकाळ' आणि तनिष्क इंडिया फाऊंडेशनतर्फे घेण्यात आलेल्या घरगुती गणेशोत्सव स्पर्धेत पुष्पराज सावंत यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

मुंबई - उत्सुकता, आनंद आणि त्यानंतर झालेला जल्लोष... असे चैतन्यपूर्ण वातावरण "सकाळ' व सुवर्णस्पर्शच्या "सुखकर्ता गणेशदर्शन' स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात अनुभवायला मिळाले. परळ येथील दामोदर नाट्य मंदिरात बुधवारी (ता. 26) स्पर्धेचा दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळा झाला. शिवडी मध्य विभाग प्रबोधनकार ठाकरे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत सर्वोत्तम ठरले. त्यांना 21 हजार रुपये रोख व मानचिन्ह प्रदान करून गौरवण्यात आले. "सकाळ' आणि तनिष्क इंडिया फाऊंडेशनतर्फे घेण्यात आलेल्या घरगुती गणेशोत्सव स्पर्धेत पुष्पराज सावंत यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

गणेशोत्सवाबरोबरच समाजभान राखणाऱ्या गणेशोत्सव मंडळांचा गौरव पुरस्कार सोहळ्यात करण्यात आला. त्याचप्रमाणे घरगुती गणेशोत्सव स्पर्धेतही अत्यंत कल्पकतेने आरास केलेल्यांना गौरवण्यात आले. सोहळ्याला ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते, सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नरेंद्र राणे, शिवसेनेचे नगरसेवक नाना आंबोले, कॉंग्रेसचे नगरसेवक सुनील मोरे, "सुवर्णस्पर्श'चे संचालक शिरीष भोसले, प्रवीण सिंग, सावंत ज्वेलर्सचे राजेंद्र सावंत, "सकाळ' (मुंबई)चे निवासी संपादक राहुल गडपाले, युनिट व्यवस्थापक दिनेश शेट्टी, सहयोगी संपादक हेमंत जुवेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

द्वितीय क्रमांक पटकावलेल्या लोअर परळ येथील पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळाला 15 हजार रोख व मानचिन्ह देण्यात आले. तृतीय क्रमांक मिळवलेल्या कन्नमवार नगर 2 मधील सार्वजनिक उत्सव समितीचा 11 हजार रोख व मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. 10 उत्तेजनार्थ पारितोषिकेही प्रदान करण्यात आली.
घरगुती गणेशोत्सव स्पर्धेत मारुती पवार यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. तृतीय क्रमांक ओमकार नांदिवडेकर आणि चौथा क्रमांक प्रमोद परदेशी यांनी मिळवला. त्यांना सावंत ज्वेलर्सच्या वतीने सोन्याचे पेंडंट भेट देण्यात आले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून संदीप पालवे, नरेंद्र घाडगे, सिद्धेश अहिर आदींनी काम पाहिले.

सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
राज्यातील पहिल्या महिला संबळ वादक सुलभा सावंत यांच्या ग्रुपने सादर केलेल्या "लोकसंगीताचा जागर' कार्यक्रमामध्ये "गोंधळाला ये' आणि "नदीच्या पल्याड' या गाण्यांनी रसिकांची विशेष दाद मिळवली. नम्रता सावंत आणि त्यांच्या ग्रुपने सादर केलेल्या बहारदार नृत्यांनी प्रेक्षकांची वाहवा मिळवली.
सुमित आणि त्यांच्या ग्रुपनेही अप्रतिम नृत्ये सादर केली. गणेशदर्शन स्पर्धेच्या निमित्ताने मुंबईतील कानाकोपऱ्यांतून आलेल्या गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या मनोरंजनासाठी विशेष सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले.

"सकाळ' (मुंबई)च्या दिवाळी अंकाचे प्रकाशन
मुंबई थीम असलेल्या आणि प्रत्येक मुंबईकराला आपलासा वाटेल अशा मुंबईच्या कला, क्रीडा, साहित्य, खाद्य आदी सर्वांगांचा वेध घेतलेल्या "सकाळ' (मुंबई)च्या दिवाळी अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मान्यवरांनीही दिवाळी अंकाच्या अपवादात्मक असलेल्या अनोख्या मुखपृष्ठाचे कौतुक केले.

उत्तेजनार्थ पुरस्कार मिळविणारी दहा मंडळे

  • - परळ विभाग सार्वजनिक उत्सव मंडळ (परळचा राजा, नरेपार्क)
  • - शिवशक्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (कांजूरमार्ग पू.)
  • - गणेशनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (घाटकोपर प.)
  • - वाडी ते वाघेश्‍वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (परळ)
  • - राऊतवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (माहीम)
  • - परळ पोस्ट गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
  • - मुंबादेवीचा गणराज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
  • - ध्रुव मित्र मंडळ (मुलुंड प.)
  • - काळेवाडी मित्र मंड (काळाचौकी)
  • - बाल मित्र मंडळ (विक्रोळी)

"सकाळ'चा उपक्रम अतिशय चांगला होता. गणेशाची सजावट करताना नैसर्गिक वस्तूंचा वापर केला होता. दोन महिने मी सजावट करत होतो. अशा प्रकारच्या "सकाळ'च्या विविध उपक्रमांत सहभागी व्हायला आवडेल.
पुष्पराज सावंत (प्रथम क्रमांक, घरगुती गणेशदर्शन)

आम्ही सजावटीमधून "पाणी वाचवा'चा संदेश दिला होता. सजावटीला मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी आपली कामे सांभाळून हातभार लावला. पर्यावरणस्नेही असलेल्या आमच्या प्रयत्नांना "सकाळ'च्या पारितोषिकाने पोचपावती मिळाली.
- प्रबोधनकार ठाकरे, शिवडी (प्रथम क्रमांक, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ)

Web Title: Results declared of Sakal Ganesh Mandal competition