रिया चक्रवर्ती म्हणतेय मी अटकेसाठी तयार; रिया निरपराध आहे, वकिलांचे पुनरुच्चार 

पूजा विचारे
Sunday, 6 September 2020

रिया चक्रवर्ती अटकेसाठी तयार असल्याची माहिती रियाचे वकील अॅड. सतीश मानेशिंदे यांनी दिली आहे.

मुंबईः अभिनेत्री रिया चक्रवर्तीला एनसीबीनं आज सकाळी समन्स बजावून कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं. त्यानुसार रिया एनसीबीच्या कार्यालयात दाखल झाली असून तिची चौकशी सध्या सुरु आहे. एनसीबीचे तीन अधिकारी तिची चौकशी करत असल्याची माहिती समजतंय. यावेळी एनसीबीचं संपूर्ण कार्यालय बंद आहे. आजूबाजूच्या परिसरात बॅरिकेड्स लावण्यात आलेत. याव्यतिरिक्त एनसीबी ऑफिसकडे येणारे सर्व रस्ते बंद देखील करण्यात आलेत.

रिया चक्रवर्ती अटकेसाठी तयार असल्याची माहिती रियाचे वकील अॅड. सतीश मानेशिंदे यांनी दिली आहे. जर हे प्रकरण जादूटोण्याचं असेल तर रिया चक्रवर्ती अटकेसाठी तयार आहे. एखाद्यावर प्रेम करणे हा गुन्हा असेल तर रिया त्याचे परिणाम भोगायला तयार असल्याचं मानेशिंदे यांनी म्हटलं आहे. 

 

तसंच रिया निर्दोष असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला आहे. तिने सीबीआय, ईडी, एनसीबी, बिहार पोलिसांनी दाखल केलेल्या केस मध्ये अटकपूर्व जामिनासाठी कोर्टाकडे धाव घेतली नसल्याचंही मानेशिंदे यांनी सांगितलं आहे. 

हेही वाचाः  NCBकडून रिया चक्रवर्तीला समन्स, अटक होण्याची दाट शक्यता

एनसीबीने रियाला सकाळी घरी जाऊन समन्स बजावले. त्यानंतर रिया एनसीबी समोर चौकशीसाठी हजर होण्याकरिता घरातून आपल्या कारने बाहेर पडली. त्यानंतर अॅड. मानेशिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. रियाला चौकशीदरम्यान अटक होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. रियावर ड्रग्सचं सेवन करणे, ड्रग्सची वाहतूक करणे आणि शौविकच्या माध्यमातून ड्रग्स मागवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरू करण्यात आला आहे. 

 

याआधी रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि सुशांतचा मॅनेजर राहिलेला सॅम्युअल मिरांडा या दोघांना एनसीबीने ड्रग्ज प्रकरणी अटक केली होती. या दोघांनाही किल्ला कोर्टानं ९ सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे. तर ड्रग्ज पेडलर कैजानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी असेल. 

अधिक वाचाः  ट्विट करुन संजय राऊतांचा कंगना राणावतवर पुन्हा एकदा निशाणा

या प्रकरणामध्ये आतापर्यंत सात लोकांना अटक करण्यात आली आहे. यात अप्पा लखानी आणि करण अरोडा यांना जामीनही मिळाला असून जैद विलात्रा आणि बासित परिहार, शौविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा यांना ९ सप्टेंबर पर्यंत कोठडी सुनावण्यात आलीय.

रियाची, शौविक, सॅम्युअल मिरांडाला समोरासमार बसवून चौकशी होण्याची शक्यता आहे. ड्रग्स कोणी कोणासाठी खरेदी केलं आणि त्यासाठी पैसे कोण देत होते? याचा शोध या चौकशीदरम्यान घेतला जाईल.

Rhea Chakraborty is ready for arrest Said Satish Maneshinde her lawyer


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rhea Chakraborty is ready for arrest Said Satish Maneshinde her lawyer