साताऱ्यासाठीचा तांदूळ आढळला वरईत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

भारतीय अन्न महामंडळाच्या फैजपूर गोदामातील सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत सातारा जिल्ह्याच्या कोट्यातील तांदळाचा साठा मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील पालघर जिल्ह्यातील वरई परिसरातील एका खासगी राईस मिलमध्ये आढळून आला आहे.

मनोर: भारतीय अन्न महामंडळाच्या फैजपूर गोदामातील सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत सातारा जिल्ह्याच्या कोट्यातील तांदळाचा साठा मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील पालघर जिल्ह्यातील वरई परिसरातील एका खासगी राईस मिलमध्ये आढळून आला आहे. कागदोपत्री साताऱ्याला पोहोचलेला हा तांदळाचा साठा प्रत्यक्षात खासगी मिलमध्ये आढळल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. पुरवठा विभागाच्या निरीक्षकांनी केलेल्या मिलच्या तपासणीत सार्वजनिक धान्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे.

अन्न महामंडळाच्या फिरोजपूर गोदामातून तांदळाचा साठा रेल्वे मार्गे ऑगस्टच्या ३० तारखेला पाठवण्यात आला होता. हा साठा साताऱ्याच्या सरकारी गोदामात पोहोचल्याचे कागदोपत्री निष्पन्न होत आहे; परंतु पालघरच्या पुरवठा निरीक्षकांना महामार्गावरील वरई गाव परिसरातील एका राईस मिलमध्ये शुक्रवारी (ता.२०) केलेल्या तपासणीत अन्न महामंडळाचा शिक्का असलेला मोठा साठा आढळून आला होता. हा साठा अन्न महामंडळाच्या फैजपूर गोदामातून सातारा जिल्ह्यासाठी पाठवण्यात आलेल्या साठ्यापैकी असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत असल्याचे पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

सातारा जिल्ह्यासाठी पाठवलेला धान्याचा साठा गैरमार्गाने खासगी राईस मिलमध्ये पोहोचला असावा, अशी शंका ग्रामस्थांनी उपस्थित केली आहे.
दरम्यान, पालघर जिल्हा पुरवठा विभागाने राईस मिलमध्ये कारवाई करत तांदळाचा साठा जप्त केला आहे. जप्त साठ्याचा पंचनामा करण्यात आला आहे. या प्रकरणी पालघरचे जिल्हा पुरवठा अधिकारी संजय अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा निरीक्षक भागवत सोनार तपास करत आहेत.

काळाबाजार उघडकीस येण्याची शक्‍यता 
सार्वजनिक वितरण प्रणालीच्या धान्यवाटपासाठी पालघर जिल्ह्याला मुंबईच्या गोदामातून धान्य दिले जाते. अन्न महामंडळाच्या फिरोजपूरच्या गोदामातून पाठवण्यात आलेला धान्यसाठा सातारा जिल्ह्यातील सरकारी गोदामाऐवजी वरईच्या खासगी राईस मिलमध्ये आढळून आल्याने सार्वजनिक वितरण प्रणालीतील धान्याचा होणारा काळाबाजार उघडकीस येण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

तांदूळ शालेय पोषण आहारातील!  
राईस मिलमध्ये आलेला तांदूळ वसई तालुक्‍यातील महिला बचत गटातर्फे प्रक्रिया करण्यासाठी मिलमध्ये आणण्यात आला आहे आणि हा तांदूळ शालेय पोषण आहारापैकी असल्याचे राईस मिलमधील कर्मचाऱ्याने सांगितले.

पुरवठा विभागाकडून मिलमधील तांदळाच्या साठ्याबाबतची कागदपत्रे तपासण्याचे काम सुरू आहे. तपासाअंती मिलमधील साठा सार्वजनिक वितरण प्रणालीचा साठा असल्याचे निष्पन्न झाल्यास कारवाई करण्यात येईल.
- संजय अहिरे,  जिल्हा पुरवठा अधिकारी, पालघर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rice for satara found in palghar