गरोदर महिलेसाठी रिक्षा थेट रेल्वेस्थानकात!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

रिक्षाचालकावर गुन्हा; हकिकत ऐकल्यावर न्यायालयाने केली सुटका

नालासोपारा : अतिवृष्टीने वसई-विरार शहरात जोरदार पावसामुळे सर्वत्र सार्वजनिक वाहतुकीसह रेल्वेसेवा ठप्प झालेली असताना, मुंबईतील रुग्णालयात जाण्यासाठी विरार स्थानकात बसलेल्या एका गरोदर महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्याने तिच्या मदतीसाठी विरारस्थानकात थेट रिक्षा आल्याची घटना रविवारी घडली. रेल्वेस्थानकात रिक्षा आणल्याप्रकरणी रिक्षाचालकावर गुन्हाही दाखल करण्यात आला; मात्र संपूर्ण हकिकत ऐकल्यानंतर न्यायालयाने या रिक्षाचालकाची सोमवारी सुटका केली.

रविवारी झालेल्या पावसाचा फटका बसल्याने विरारमधून लोकल सोडण्यात येत नव्हत्या. सर्व गाड्या रेल्वेस्थानकावरच थांबवण्यात आल्याने अनेक जण अडकून पडले होते; मात्र यात २२ वर्षीय मोमिता हलदर नावाची गरोदर महिला विरार रेल्वेस्थानकातील फलाट क्रमांक २ वर उभ्या असलेल्या लोकलमध्ये कांदिवली येथील जनशताब्दी रुग्णालयात जाण्यासाठी तिच्या कुटुंबियांसह बसली होती.

या महिलेला सकाळी साडेआठच्या सुमारास प्रसूतीच्या असह्य वेदना होत असल्याने तिचे कुटुंबीय चिंतेत होते. तेथीलच एका साध्या वेषात असलेल्या पोलिस अधिकाऱ्याच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तात्काळ रेल्वेस्थानकाबाहेर स्वत:च जाऊन सागर गावडे या रिक्षाचालकाला विनंती केल्याने त्याने तत्काळ प्रसंगावधान राखून रिक्षा थेट रेल्वे फलाटावर आणून महिलेला घेऊन संजीवनी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पाच ते दहा मिनिटातच महिलेने एका गोंडस मुलाला जन्म दिला आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. थेट फलाटावर रिक्षा चालवणाऱ्या रिक्षा चालकाला रेल्वेच्या कायद्याचा बडगा सहन करावा लागला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rickshaw enters in station for pregnant woman