मुंबईकरांच्या खिशाला कात्री? रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीस १ ऑक्टोबरपासून तत्त्वतः मान्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rickshaw-taxi fare hike from October 1 strike inflation mumbai

मुंबईकरांच्या खिशाला कात्री? रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीस १ ऑक्टोबरपासून तत्त्वतः मान्यता

मुंबई : खटुआ समितीच्या आधारे महागाईच्या निर्देशांकाप्रमाणे मुंबई महानगरातील टॅक्सी, रिक्षांची येत्या १ ऑक्टोबरपासून भाडेवाढ लागू करणार असल्याचे सरकारने शुक्रवारी तत्त्वतः मान्य केले. त्यानुसार रिक्षाचे भाडे दोन, तर टॅक्सीचे भाडे तीन रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, भाडेवाढीच्या मागणीसाठी मुंबई टॅक्सी मेन्स युनियनने आतापर्यंत संपातून तीन वेळा माघार घेतली. आजही मंत्रालयात झालेल्या बैठकीत येत्या २६ सप्टेंबरपासून होणारा संप मागे घेण्यात आला. त्यामुळे संपाचा धाक दाखून भाडेवाढीसाठी सरकारवर दबाव आणला जात असल्याचे म्हटले जात आहे.

रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीच्या मागणीसाठी मुंबई टॅक्सी मेन्स युनियनने येत्या २६ सप्टेंबरपासून संपावर जाण्याचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मंत्रालयात बैठक घेतली. या वेळी परिवहन विभागाचे सचिव, आयुक्त, अधिकाऱ्यांसह रिक्षा, टॅक्सी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. येत्या सोमवारी मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाची (एमएमआरटीए) बैठक होणार असून त्यात भाडेवाढीबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर रिक्षा, टॅक्सी भाडेवाढ १ ऑक्टोबरपासून लागू केली जाईल, असे आश्वासन सरकारने दिले. त्यानुसार रिक्षाचे भाडे दोन, तर टॅक्सीचे भाडे तीन रुपयांनी वाढणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे १ ऑक्टोबरपासून रिक्षाचे किमान भाडे २१ ऐवजी २३ रुपये, तर टॅक्सीचे किमान भाडे २५ ऐवजी २८ रुपये मोजावे लागणार आहे.

मुंबईकरांच्या खिशाला कात्री?

जीवनावश्यक वस्तूंसह भाजीपाला, खाद्यपदार्थ, गॅस सिलिंडर, इंधन दरवाढीपाठोपाठ आता रिक्षा, टॅक्सीचीही भाडेवाढ होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्या मुंबईकराच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारने १ ऑक्टोबरपासून भाडेवाढ लागू करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे नियोजित संप मागे घेण्यात आला आहे.

- ए. एल. क्वाड्रोस, सरचिटणीस, मुंबई टॅक्सी मेन्स युनियन

Web Title: Rickshaw Taxi Fare Hike From October 1 Strike Inflation Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..