अन्य धर्मियांचे सण-विधी घरात करण्याचा अधिकार : हायकोर्ट

सुनीता महामुणकर
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

एखाद्या विशिष्ट धर्माच्या व्यक्तिला दुसऱ्या धर्मातील विधी-सण परंपरा स्वतःच्या घरामध्ये पाळण्याचा अधिकार आहे, असे  मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. 

मुंबई : अजमेरच्या दर्गावर चादर चढविणाऱ्यांमध्ये हिंदु धर्मिय अधिक असतात आणि गणपती उत्सवात मुस्लिम समुदाय उत्साहाने सहभागी होत असतात, त्यामुळे एकमेंकांच्या धार्मिक उत्सवांमध्ये सहभागी होण्याची मोठी परंपरा आपल्याकडे आहे, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदविले आहे.

एखाद्या विशिष्ट धर्माच्या व्यक्तिला दुसऱ्या धर्मातील विधी-सण परंपरा स्वतःच्या घरामध्ये पाळण्याचा अधिकार आहे, असेही खंडपीठाने म्हटले असून, हिंदु व्यक्तिला घरामध्ये मोहरम पाळण्याची परवानगी दिली आहे. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठापुढे मोहरम साजरा करण्यासाठी परवानगीची मागणी करणारी याचिका नरहरी ठाकूर (नाव बदलले आहे) यांनी केली आहे. मंगळवारी होणाऱ्या मोहरमच्या विधीसाठी परवानगी देण्याची मागणी त्यांनी याचिकेद्वारे केली होती. स्थानिक परिसरातील नागरिकांनी त्यांना मोहरमचे विधी करु नका, यामुळे धार्मिक तणाव निर्माण होईल, असे सांगितले होते.

तसेच त्यांनी पोलिसांकडेही याबाबत तक्रार केली होती. त्यामुळे पोलिसांनीही ठाकूर यांना फौजदारी दंड संहिता कलम 140 नुसार नोटीस बजावली होती. तुम्ही मोहरम केला तर अन्य धर्मियांच्या भावना दुखावतील, त्यामुळे तुमच्यावर कारवाई केली जाईल, असे नोटीसीमध्ये म्हटले होते. ठाकूर यांनी या नोटीसीला न्यायालयात याचिकेद्वारे आव्हान दिले. न्या. टी व्ही नलावडे आणि न्या. आर जी अवचट यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली.

आपल्या देशात वेगवेगळ्या धर्माच्या सण-परंपरामध्ये सामील होण्याची परंपरा आहे, गणपती-दिवाळी-ईद-मोहरम अशा सर्वांमध्येच हिंदु-मुस्लिम एकत्रपणे सहभागी झालेले असतात, धर्माच्या पलिकडचे हे नाते असते आणि ते लोकांनीच तयार केलेले असते, अशी भावना देशामध्ये अधिक प्रमाणात वाढायला हवी, त्यामुळे एखाद्या विशिष्ट धर्माच्या व्यक्तिला अन्य धर्माचे सण-विधी स्वतःच्या घरात करण्याचा अधिकार आहे, असे खंडपीठाने म्हटले आहे. याचिकादार त्याच्या घरामध्ये मोहरमचे विधी करु शकतात, त्यातून ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचा भंग होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आदेश खंडपीठाने दिले. पोलिसांनी दिलेली नोटीसही न्यायालयाने रद्दबातल केली.

दरम्यान, ज्याप्रमाणे आजच्या काळात गणेशमूर्तींचे विसर्जनही घरच्या घरी इको-फ्रेंडली पद्धतीने केले जाते त्याप्रमाणे याचिकादारानेही घरच्या घरी विधी करण्याची पद्धती अवंलबावी, म्हणजे पोलिस यंत्रणाही त्याला नाकारणार नाही, असेही खंडपीठाने स्पष्ट केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Right to observe rituals in one's own home : High Court